पिंपरी चिंचवड पालिकेच्या नागरवस्ती विभागाची होणार चिञफिट तयार
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांतर्गत चित्रफित तयार करण्यात आली असून चित्रफित तयार करणाऱ्या संस्थेला आठ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागामार्फत शहरातील महिला, बालके, मागासवर्गीय व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, अनाथ, निराधार या घटकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबविण्यात येतात. या योजनांतर्गत दिव्यांग योजनांचे अर्थसाहाय्य देण्याचे काम महापालिकेमार्फत केले जाते.
या कल्याणकारी योजनांची माहिती चित्रफितीद्वारे जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे, तसेच महापालिकेला भेट देणाऱ्या मान्यवरांना, अभ्यागतांना या चित्रफिती दाखविल्यास महापालिकेचा नावलौकिक वाढविण्यास मदत होईल. त्या अनुषंगाने ही चित्रफित तयार करण्यासाठी 21 मे 2018 रोजी जाहिरात संस्थांची निवडसूची तयार करण्यात आली होती. या निवडसूचीतून पुणे विभागासाठी नियुक्ती झालेल्या पुणे जिल्ह्यातील सात संस्थांना दर सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2021 रोजी पत्र देण्यात आले होते.
त्यानुसार, एस. बी. प्रॉडक्शन यांचा लघुत्तम दर प्राप्त झाल्याने त्यांना कामाचे आदेश देण्यात आले होते. त्यांनी केलेल्या कामाचे बिल नागरवस्ती योजना विकास विभाग 2021-22 च्या अंदाजपत्रकात ‘महिलांसाठी योजना या लेखाशिर्षांतर्गत असणाऱ्या विविध योजनांची माहिती, प्रचार व प्रसार’ या उपलेखाशिर्षावरील तरतुदीमधून देण्यास अतिरिक्त आयुक्त यांनी 26 नोव्हेंबर 2021 रोजी मान्यता दिली. एस. बी. प्रॉडक्शन यांनी जागतिक दिव्यांग दिनाच्या कार्यक्रमात दिव्यांग कल्याणकारी योजनांवर आधारित केलेली फिल्मनिर्मिती सर्व मान्यवरांसमोर आणि दिव्यांगांना दाखविण्यात आली.