महिलेचा विनयभंग करून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी
चिंचवड(वास्तव संघर्ष : महिलेचा आणि तिच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्यास जाब विचारला असता त्याने ॲट्रोसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. महिलेला ‘तू माझी नाही झालीस तर मी तुला कोणाची होऊ देणार नाही’ अशी धमकी दिली. हा प्रकार सन 2018 पासून 13 फेब्रुवारी 2022 या कालावधीत दत्तनगर धोबी घाट जवळ चिंचवड येथे घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चरणदास महादेव खडसे (वय 45, रा. दत्तनगर धोबी घाट जवळ, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची मुलगी घरासमोर काम करत असताना आरोपी त्यांच्याकडे पाहून इशारा करून अश्लील वर्तन करत होता. हा प्रकार वारंवार होत असल्याने फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय आरोपीकडे विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची आरोपीने धमकी दिली.
रविवारी (दि. 13) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्याकडे बघून ‘तू माझी नाही झालीस तर मी तुला कोणाची होऊ देणार नाही’ अशी धमकी दिली. त्यावर फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याला शिवीगाळ करून आरोपीने ढकलून दिले. फिर्यादी सोबत अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. ‘तुझ्यासाठी मी पाच वर्ष घालवले. तू माझी झाली पाहिजे’ असे म्हणून त्याने पुन्हा फिर्यादी महिला आणि तिच्या मुलीचा विनयभंग केला. अधिक तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे करीत आहेत.