बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वाहतुकीला अडथळा ठरणा-या रिक्षा स्टॅन्ड हटविण्याचा निर्णय

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक समस्या सोडविण्यासाठी वाहतुकीला अडथळा ठरणा-या रिक्षा थांब्यांचे  सर्वेक्षण करून योग्य ठिकाणी स्थानांतरण करण्याचा निर्णय आज महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये झालेल्या समन्वय आढावा बैठकीत घेण्यात आला.महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि शहर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहराच्या पार्किंग पॉलिसी आणि वाहतुक समस्यांबाबत तसेच एकमेकांशी निगडीत असलेल्या विषया संबंधी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या मध्ये आज समन्वय आढावा बैठक संपन्न झाली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता बापुसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, डॉ.सागर कवडे, सतीश माने, महापालिकेचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता तसेच पार्किंगचे कंत्राट दिलेल्या एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शहरातील विविध ठिकाणी होणा-या वाहतुक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.बहुतेक चौकांमध्ये तसेच महत्वाच्या रस्त्याच्या ठिकाणी रिक्षा थांबे करण्यात आले आहेत.त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रिक्षा थांब्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे स्थानांतरण वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी करण्यासाठी नियोजन आणि आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.  शहरात पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात  बैठकीत चर्चा करण्यात आली. रस्त्यावर होणा-या अस्ताव्यस्त पार्किंगचा वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महापालिकेने पार्किंग पॉलिसी तयार केली आहे.  त्या अंतर्गत पार्किंग आणि नो-पार्कींगची ठिकाणी  जाहीर करण्यात आली आहेत. या पॉलिसीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या वतीने संयुक्तपणे मोहिम राबविण्यात येणार आहे.  त्याकरिता नो-पार्किंग मधील वाहने उचलण्यासाठी टोईंग व्हॅन, टेम्पो आणि मजूर पुरविणे तसेच  उचललेली वाहने ठेवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेकडे असणार आहे. तर या यंत्रणेसोबत पोलीस कर्मचारी पोलीस प्रशासनाच्या वतीने दिले जातील असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.  या पॉलिसीची अंमलबजावणी येत्या 19 फेब्रुवारी पासून प्रत्यक्ष केली जाणार आहे.                         

पादचारी मार्गावरील अतिक्रमण त्वरीत हटविण्याचे तसेच पदपथावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त पाटील यांनी प्रशासनाला दिले.  महापालिकेच्या मिळकती पोलीस प्रशासनाला वापराकरिता देण्यात आल्या आहेत.अशा मिळकतींच्या वापराबाबत प्रशासकीय बाबींची पुर्तता करण्यात यावी, अशी सूचना आयुक्त राजेश पाटील यांनी बैठकीत दिली.

Share this: