नगरसेवक रवि लांडगे, संजय नेवाळे यांचा राजीनामा
पिंपरी(वास्तव संघर्ष) : आमदारांची मनमानी, हुकूमशाही तसेच भाजपा मधील भ्रष्ट कारभाराला कंटाळून निष्ठावंत गटातील नगरसवेक रवि लांडगे आणि संजय नेवाळे यांनी आज आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. यापूर्वी वसंत बोराटे, तुषार कामठे, माया बारणे, चंदा लोखंडे या चार नगरसेवकांनी भाजपाला रामराम ठोकला. भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी थांबविण्याचा प्रयत्न करूनही रवि लांडगे यांनी पक्ष सोडल्याने आमदार महेश लांडगे आणि भाजपाला मोठा धक्का बसला. गळती सुरूच राहिल्याने भाजपाचे नेते चिंताग्रस्त आहेत. सुमारे २२ नगरसेवक भाजपा सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. भाजपा सोडणारे बहुतांश नगरसवेक राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीची बाजू भक्कम झाली आहे.
भाजपा सोडण्यामागचे कारण देताना राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांनी भाजपाच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले. जे काही आरोप केले त्यावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकाचाही खुलासा केलेला नाही. खुद्द आमदार निरुत्तर असल्याने गूढ वाढले आहे. रवि लांडगे यांनी भोसरी रुग्नालयाच्या खासगीकरणाचा करार करताना गरवर्षी १७ कोटी रुपये प्रमाणे ३० वर्षांचा करार करून आमदारांनी स्वतःची सोय लावली, असा अत्यंत गंभीर आरोप केला. माया बारणे यांनी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामात ५७ कोटी रुपयांचा गैरव्यवाहर झाल्याचे सांगत भाजपाचा मुखभंग केला. तुषार कामठे यांनी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात १२२ कोटी रुपये काम न करताच उकळल्याचे उघड केले. खुद्द भाजपा नगरसवेकांनीच हे आरोप केल्याने भाजपा त्रस्त आहे. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराल कंटाळून बाहेर पडत असल्याच्या आरोपामुळे खळबळ आहे.
भाजपावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीसुध्दा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यात भाजपा शहर सरचिटणीसाशी संबंधीत ठेकेदाराने कुत्र्यांच्या नसबंदीत बनावट कागदपत्रे सादर करून ७ कोटी रुपये लाटले, वृक्षगणनेत ५ कोटींचा गरव्यवहार केला तसेच बेकायदा होर्डींग्ज काढण्याच्या ठेक्यात महापालिकेला ८ कोटींना ठगवले असे आरोप केले आहेत. यापैकी अकाही आरोपाचे निराकरण भाजपाने केलेले नाही. भाजपाचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे लाच प्रकरणात आठ दिवस पोलिस कोठडीत होते, तर माजी उपमहापौर केशव घोळवे हे खंडणी प्रकऱणात आठवडाभर जेलमध्ये होते, असा निवडणूक प्रचाराचा मुद्दाच राष्ट्रवादीने केला आहे. त्यातच नगरसवेकांच्या राजीनामा सत्र सुरू झाल्याने भाजपाची अवस्था बिकट होत चालली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष म्हणून अजित गव्हाणे यांनी पदभार घेतल्यापासून राष्ट्रवादीचा भव्य मोर्चा, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील निदर्शने आणि भाजपा नगरसेवकांचे राजीनामा सत्र सुरू झाले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला कोणत्याही परिस्थितीत नेस्तनाबूत करायचे अशी राष्ट्रवादीची व्युहरचना असून त्यासाठी पक्षातील गटतट विसरून आजी-माजी नगरसवेक कामाला लागले आहेत