प्रेमप्रकरणातून 22 वर्षीय दलित तरुणांची पुण्यात हत्या
पुणे (वास्तव संघर्ष) :सवर्ण मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला घरात कोंडून धारदार शस्त्रे आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.ही घटना पुण्यातील शिवणे परिसरात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
प्रद्युम्न प्रकाश कांबळे (वय 22 रा.गोखले नगर येथील रामोशी वाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अजय पायगुडे (19), सागर राठोड (22), विजय पायगुडे (46) आणि वंदना पायगुडे (40, सर्व रा. शिवणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी वंदना पायगुडे हीच्या मुलींशी प्रद्युम्न यांचे प्रेमसंबंध होते.प्रद्युम्न हा दलित समाजातील असल्याने आरोपी वंदना यांना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते.बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास प्रदुम्न हा आरोपी वंदना यांच्या मुलीला भेटण्यासाठी तीच्या घरी गेला होता. त्यामुळे मुलीच्या आईने घरात का आलास असा जाब विचारला. त्याच्यानंतर दोघात भांडण झाले आणि प्रदुम्नला घरात कोंडून बेदम मारहाण करण्यात आली.दरम्यान प्रदुम्न कांबळे हा तिथून निसटून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून दोन तरुणांच्या मदतीने त्याला पुन्हा मारहाण केली.
काही वेळाने त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी पोहोचले.त्यानंतर या तरुणाला मारहाण करून दोघे रिक्षातून पळून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना दिली.पोलिसांनी जखमी युवकाला रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वंदनासह चार जणांना भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 302, 341 आणि 34 शस्त्रास्त्र कायदा आणि अनुसूचित जाती जमातीच्या(ॲट्रॉसिटी प्रतिबंधक) कायदा कलमांनुसार अटक केली आहे.सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे अधिक तपास करीत आहेत.