बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

महापुरुषांच्या विचारांचे पाठबळ पाठीशी असल्यास कोणत्याही प्रसंगाला सहजतेने सामोरे जाता येईल – आयुक्त राजेश पाटील

पिंपरी (वास्तव संघर्ष) : महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपेक्षितांचे जीवनमान उंचावण्यासाठी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य मार्गदर्शक आणि प्रेरक ठरत आहे. आधुनिक युगातही त्यांनी केलेल्या कार्याचा ठसा दिवसेंदिवस वाढत असून महापुरुषांच्या विचारांचे पाठबळ पाठीशी असल्यास वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना कोणत्याही प्रसंगाला सहजतेने सामोरे जाता येईल आणि प्रसंगही हाताळता येतील,असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यकारी अभियंता तथा मुख्य संयोजक संजय भोसले, संयोजक सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, लेखाधिकारी प्रदीप बाराथे, विजय कांबळे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

आयुक्त पाटील म्हणाले, महात्मा जोतीराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, शेतकऱ्याचे आसुड, ब्राह्मणांचे कसब या साहित्यातून जे विचार मांडले ते आधुनिकतेच्याही पलिकडे आहेत. सावित्रीबाई फुले यांनीही विशेष कार्य केले आहे. आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. या महापुरुषांच्या विचारांचे आचरण आपल्या जीवनात केल्यास ते खरे अभिवादन ठरेल. त्यांनी समाजशास्त्र अर्थशास्त्र तसेच सामाजिक,आर्थिक, राजकीय, धार्मिक तसेच जीवनातील विविध क्षेत्रात आपले विचार मांडले आहेत. ज्ञान शिक्षणासह हक्क अधिकारापासून खितपत पडलेल्या वंचित बहुजन समाजाला, तळागाळातील जनतेला आणि स्त्रियांना जागे करण्याचे काम आणि विचारांचे अधिष्ठान देण्याचे कार्य महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.

प्रस्थापित विचारांपेक्षा या महापुरुषांचे विचार क्रांतिकारक असून समाजातील प्रत्येक स्तराला व्यापणारे तसेच समाजाला मार्गदर्शन करणारे आणि उजेडात आणणारे हे विचार आहेत. या महापुरुषांचे साहित्य प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे, त्याचे नेहमी पारायण केले पाहिजे. त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्यास खऱ्या अर्थाने आपण या महापुरुषांचे अनुयायी ठरु. या प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार व कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असून सर्वांच्या सहभागातून त्याची फलश्रृती होईल असा आशावाद आयुक्त पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी प्रबोधन पर्वा मध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा सत्कार आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक संजय भोसले यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले तर आभार संयोजक विजय कांबळे यांनी मानले.

Share this: