धक्काबुक्की करत रामदास आठवले यांना कानशिलात लगावली
रिपाईकडून संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात रामदास आठवले आले होते.
अंबरनाथ-मधील एका कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. येथील विमको नाका परिसरात रिपाईकडून संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामदास आठवले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी भाषणही केले. यानंतर ते स्टेजवरून उतरून गाडीकडे चालत जात असताना त्यांना धक्का बुक्की करत एका व्यक्तीने रामदास आठवले यांच्या कानशिलात लगावली. तेव्हा आजुबाजूच्या कार्यकर्त्यांना लगेचच या व्यक्तीला पकडून चोप दिला. या प्रकारानंतर रामदास आठवले मुंबईकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव प्रविण गोसावी आहे तो अंबरनाथ येथेच राहणारा आहे. कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारल्याने त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
पण त्याने रामदास आठवले यांच्यावर हल्ला का केला हे अद्याप कळू शकलेले नाही. आठवले यांनी मराठा आरक्षण न्यायालयात टिकू शकेल की नाही, अशी शंका उपस्थित केल्याने हा हल्ला झाल्याचा अंदाज काहीजणांनी वर्तवला आहे. या घटनेनंतर अंबरनाथ व उल्हासनगर परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला
मागास आयोगाने दिलेल्या अहवालाप्रमाणे मराठा समाजात देखील मागासांची संख्या मोठी आहे त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा उच्च न्यायालयात कदाचित टिकेल मात्र टक्केवारीचा विचार करता सुप्रीम कोर्टात हा मुद्दा टिकेल की नाही, याबाबत आपण साशंक असल्याचे आठवले म्हटले होते. पुतळे किंवा मंदिरे व्हावीत ही लोकभावना आहे आणि ती जपली नाही तर आम्हाला मतं मिळणार नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी विरोध केला तरी स्मारकात बाबासाहेबांचा पुतळा बसणारच, अशी भूमिका आठवले यांनी मांडली होती.