नागरवस्ती विभागाचे नाव यापुढे “समाज विकास विभाग” असणार
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महापालिकेचा “नागरवस्ती विकास योजना विभाग” यापुढे “समाज विकास विभाग” या नावाने संबोधला जाणार आहे अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.
आयुक्त पाटील यांनी याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे. महापालिकेच्या सर्व दप्तरी “नागरवस्ती विकास योजना विभाग” ऐवजी “समाज विकास विभाग” अशी नोंद करावी असे आदेशात नमूद केले आहे.महिला, बालक आणि मागासवर्गीयांसाठी योजना राबविण्याकरीता नागरवस्ती विकास योजना असा स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला होता. या विभागामार्फत विविध समाज उपयोगी कल्याणकारी योजना राबविल्या जातात.
यामध्ये महिला व बालकल्याण योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी अर्थसहाय्य, महिलांना चारचाकी वाहन प्रशिक्षण, उच्च शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य, मुलींना कुंफू कराटे प्रशिक्षण, महिलांसाठी योगासन प्रशिक्षण, जननी शिशु सुरक्षा अंतर्गत मनपाच्या रुग्णालयामध्ये प्रसुती झालेल्या महिलांना मोफत आहार योजना, परदेशातील उच्च / शिक्षण अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या युवतींना अर्थसहाय्य, निर्भया अस्तिव पुनर्वसन, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना अर्थसहाय्य, महिलांसाठी ज्ञान कौशल्य विकास, विधवा महिलांकरीता पुनर्विवाह प्रोत्साहन, महिला बचत गटांना अर्थसहाय्य, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य, मतिमंद व्यक्तींच्या पालकासाठी अर्थसहाय्य, वय वर्षे 50 पार केलेल्या तृतीयपंथी व्यक्तीसाठी पेंशन योजना आदी योजना राबविल्या जात आहेत.अर्थातच सर्व समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नागरवस्ती विकास योजना विभाग कार्यरत आहे.
आता हा विभाग समाज विकास विभाग या नावाने संबोधला जाणार आहे.त्यामुळे या विभागाशी पत्रव्यवहार अथवा तत्सम संपर्क साधताना समाज विकास विभाग असे संबोधन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.