बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

ठरलं एकदाचं….! पालिकेच्या निवडणुकीसाठी 31 मे रोजी आरक्षण सोडत

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी 31 मे रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबत महापालिकेला लेखी आदेश दिले आहेत. महापालिकेचे एकूण 46 निवडणूक प्रभाग असणार आहेत. या प्रभागामधून 139 नगरसेवकांना मतदार निवडून देतील. त्यातील 50 टक्के जागांवर महिला नगरसेविका असतील. 139 पैकी अनुसूचित जातीसाठी 22 (महिलांसाठी – 11), अनुसूचित जमातीसाठी तीन (महिलांसाठी दोन), तसेच खुला 114 (महिलांसाठी 57) जागा असतील. 46 पैकी कोणता प्रभाग कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असेल, हे पुढच्या मंगळवारी निश्चित केले जाणार आहे.

महापालिका प्रशासन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आरक्षण सोडत घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून लवकरच माहिती दिली जाणार आहे.

महापालिका हद्दीत 2011 साली असलेल्या लोकसंख्येचा आधार घेऊन निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आळी आहे. त्यावेळी एकूण 17 लाख 27हजार 692 लोकसंख्या होती. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या 2 लाख 73 हजार 810 आणि अनुसूचित जमातीच्या 36 हजार 535 लोकसंख्येचा समावेश आहे. त्यानुसार महापालिकेचे 39 निवडणूक प्रभाग तयार करण्यात आले असून, तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार नगरसेवकांची संख्या एकूण 139 असणार आहे. त्यातील 22 जागा अनुसूचित जातीसाठी, तीन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. यंदा ओबीसी आरक्षण नसणार आहे. त्यामुळे उर्वरित 114 जागा खुल्या असतील. प्रत्येक प्रभागात महिलांसाठी 50टक्के राखीव जागा असतील.

ओबीसी आरक्षण नसल्यामुळे आरक्षण सोडतीच्या दिवशी फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी राखीव जागांसाठी सोडत काढण्यात येईल. ज्या प्रभागाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी जास्त असेल, अशा प्रभागापासून सुरूवात करून 22 प्रभागातील 1 जागा अनुसूचित जातीकरिता राखीव ठेवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीने अनुसूचित जमातीसाठी राखीव तीन जागा आरक्षित केल्या जाणार आहेत. महिलांच्या 50 टक्के राखीव जागांसाठी चिठ्ठ्या काढल्या जातील.

Share this: