क्राईम बातम्यामहाराष्ट्र

विराज जगताप आणि अरविंद बनसोडे हत्याकांड ;सत्यशोधक संघटनेचे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नांदेड (वास्तव संघर्ष) – कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेली जातीय हिंसा व अत्याचार रोखण्याच्या अनुषंगाने सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्यावतीने नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सत्यशोधक विद्यार्थी संघटना महाराष्ट्राचे माजी राज्य सचिव मनेष खटावे, नांदेड जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल गच्चे, सदस्य पुंडलिक गच्‍चे, आदेश सोनकांबळे, मोहन सोनसळे आदी उपस्थित होते.

देशात लॉकडाऊन असताना बौध्द , आदिवासी, स्त्रिया, भटकेविमुक्त, कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. हिंसा व अत्याचार प्रकरणी शासन यंत्रणेची व पोलिसांची भूमिका अत्याचारी जातीयवादी लोकांचे मनोबले वाढविणारी असते. हे रोखले गेले पाहिजे. पोलीस तपास व पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये मुद्दामहून त्रुटी ठेवल्या जातात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत गुन्हेगार मोकाट सुटतो, असे प्रकार रोखले गेले पाहिजेत. यासाठी कडक कायदा करण्यात यावा. भारतीय संविधान अनुच्छेद-15 नुसार कायद्याने जातीभेद करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

जातीय झुंडशाहित निर्माण होणारे ऑनर किलर सारखे प्रकार रोखावेत. जातीय द्वेषावरून बौध्दावर होणारे अन्याय अत्याचार थांबवावेत. शिक्षण प्रणालीमध्ये निर्माण झालेली फॅसिस्ट ब्राह्मणी भांडवली व्यवस्था नष्ट करावी. पिंपरी चिंचवड येथे प्रेम प्रकरणातून सांगवीत बौद्ध तरुणाचा जातीय मानसिकतेतून खून करण्यात आला तसेच अरविंद बनसोडे यांच्या मारेकऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी. आदी मागण्यांसाठीचे निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाऊन उठवल्यानंतर आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल, असे यात म्हटले आहे. सध्या संघटनेचे ऑनलाइन आंदोलन सुरू आहे.

Share this: