धक्कादायक :आरटीई प्रवेश असलेल्या लहान विद्यार्थ्यांना भेदभावाची वागणूक
पिंपरी (वास्तव संघर्ष) : सर्व शिक्षा अभियानांतर्गत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क देण्यात आला आहे. त्यानुसार आर.टी.ई. मध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला जातो. अशा शाळा ज्या मध्ये गरीब विद्यार्थी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी स्वप्न बघतात मात्र ; याच शाळा आता लहान मुलांना भेदभावाची वागणूक देताना आढळून आल्या आहेत. अशीच एक शाळा पिंपरीतील एसएनबिपी( SNBP) इंटरनॅशनल स्कूल यांना पिंपरी चिंचवड पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी नोटीस बजावली आहे.
यामध्ये म्हटले आहे की, आपले शालेय व्यवस्थापन फी व्यतिरिक्त ऍडमिशन फीच्या नावे जबरदस्ती देणणी घेत असलेबाबत तक्रार अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. त्यानुसार या कार्यालयातील विभागीय पर्यवेक्षक यांनी आपल्या शाळेची तपासणी करून अहवाल सादर केलेला आहे. विभागीय पर्यवेक्षक यांचेकडील प्राप्त अहवालानुसार आपल्या(SNBP INTERNATIONAL SCHOOL) शाळेतील प्रवेश शुल्क हे जास्त प्रमाणात आकारले जात असल्याचे आढळून आले आहे तसेच आपण आर.टी.ई. प्रवेशित विद्यार्थ्यांना वेगळे बसवत असल्याचे निर्देशनास आले आहे असे कळविले आहे.
आर.टी.ई. प्रवेशित विद्यार्थ्यांना वेगळे बसवून आपण बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम2009 मधील कलम 12 पोटकलम ( 1 ) च्या खंड (ग ) अनुसार प्रवेश दिलेल्या बालकांना सापत्नभावाची वागणूक दिली जाणार नाही त्यांना वर्गामध्ये इतर बालकांपासून वेगळे ठेवले जाणार नाही अथवा त्यांचे वर्ग इतर बालकांसाठी भरवण्यात येणा-या वर्गाच्या ठिकाणापेक्षा व वेळेपेक्षा वेगळ्या ठिकाणी व वेळी भरवण्यात येणार नाहीत , त्यांच्याकरिता व इतर बालकांकरिता जादा वर्ग व्यतिरिक्त कोणतेही कार्यक्रम स्वतंत्रपणे राबविणेत येणार नाहीत. अशी स्पष्ट तरतुद असतानाही आपण आर.टी.ई. अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांना सापत्नभावाची वागणुक देत आहे. सदरची बाब योग्य नसून आपण शालेय संहितेचा व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी आपण आर.टी.ई. प्रवेशित विद्यार्थ्यांना तात्काळ समकक्ष वर्गामध्ये सामावून घेवून याबाबत तक्रार प्राप्त होणार नाही याची दक्षता घ्यावी. आर.टी.ई. प्रवेशित विद्यार्थ्यांना समकक्ष वर्गांमध्ये सामावून न घेतल्यास बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार आपल्या शाळेवर कारवाई प्रस्तावित करणेत येईल याची स्पष्ट नोंद घ्यावी.
दरम्यान, आप पालक युनियनचे अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी याबाबत या शाळेची पोलखोल केली असून त्यांनी पञ व्यवहार करत पिंपरी चिंचवड शिक्षण प्रशासनाला सदरील परिस्थिती सांगितली त्यानुसार प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी शाळेला नोटीस पाठवली असून तातडीने ही सापतनभावाची व मानहानी कारक वागणूक थांबवण्यास सांगितले आहे.हे तातडीने न झाल्यास शाळे विरूद्ध फौजदारी कारवाई साठी आप पालक युनियन तक्रार देईल व संबंधित शिक्षण अधिकार्या विरुधही शिक्षण हकक कायद्यानुसार कारवाई ची मागणी करेल असे देखील किर्दत यांनी सांगितले.