पिंपरी-चिंचवडच्या ‘त्या’ भाईला पोलिसांनी चोवीस तासांच्या आत केली अटक
भोसरी (वास्तव संघर्ष): मी पिंपरी-चिंचवडचा भाई मला कोणी डिवचले तर एकएकाला गोळ्या घालून मारून टाकेन.असे म्हणून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या भाईला पोलिसांनी अटक केली आहे.हा प्रकार मंगळवारी (दि.4) मध्यरात्री मोशी येथील नागेश्वर मंदिरा जवळ घडला.
याप्रकरणी पोलीस हवालदार विजय गंभिरे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चंदन सुरेंद्र सिंग (वय 35 रा.थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चंदन याला 23 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरीही त्याने आदेशाचा भंग करत मंगळवारी आरोपी मोशी परिसरात आला.त्याच्याकडे एक देशी बनावटीची लोखंडी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे होती. शस्त्रासह परिसरात फिरत मीच आहे पिंपरी-चिंचवडचा भाई चंदनसिंग, मला कोणी डिवचले तर एकएकाला गोळ्या घालून मारून टाकेन.माझ्या नादाला लागून नका म्हणून मोठमोठ्य़ाने ओरडत परिसरात दहशत पसरवत होता. पोलिसांना खबर मिळताच गुंडा विरोधी पथकाने त्याला चोवीस तासांच्या आत शस्त्रासह अटक केली आहे.अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.