बोगस टपरी पथारी सर्वेक्षणावर पालिकेची आहे करडी नजर
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पालिकेने टपरी पथारी आणि फेरीवाला विक्रेत्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.आज दिवसभरात सर्वेक्षणाचा आकडा चार ते पाच हजारापर्यंत गेला असून महिनाभराच्या या सर्वेक्षणात 50 हजारांपेक्षा अधिक विक्रेत्यांची नोंद होण्याची शक्यता आहे.मात्र त्या विक्रेत्यांमध्ये काही बोगस विक्रेते हे आपले नाव समाविष्ट करण्याची दाट शक्यता असल्याने पालिकेची अशा बोगस टपरी पथारी सर्वेक्षणावर करडी नजर असल्याची माहिती भूमी आणि जिंदगीचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली आहे.
यावेळी जोशी म्हणाले,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने टपरी पथारी आणि फेरीवाला विक्रेत्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणात विक्रेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून ते तीन टप्प्यात होईल प्रथम त्यांचे बायोमेट्रीक पध्दतीने सर्वेक्षण केले जाईल नंतर कागदपत्रे तपासणी केली जाईल त्यानंतर तो विक्रेता त्या ठिकाणी व्यवसाय करत आहे का याची केव्हाही अधिकारी तपासणी करतील आणि त्यानंतर विक्रेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.अशातच कोणी फक्त सर्वेक्षणापुरताच व्यवसाय दाखवला असेल तर त्यांची नोदणी रद्द करण्यात येईल.
भाजीपाला,फळे,खेळणी,मसाले,सौंदर्यप्रसाधने,कपडे,खाद्यपदार्थ,चप्पल – बूट, छोटे मोठे साहित्य व माल विक्रेते तसेच चहा विक्रेते,गॅरेज,पंक्चरवाले, सलून,टपरी फेरीवाले व व्यावसायिकांचा पालिका सर्वेक्षण करत असून त्याला उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात आतापर्यंत 4 हजार 500 विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
एका घरातील एकाच व्यक्तीचे सर्वेक्षण केले जाते.सर्वेक्षणात सहभागी झालेल्या विक्रेत्यांची यादी वृत्तपत्र,महापालिकेचे संकेतस्थळ व क्षेत्रीय कार्यायलांत प्रसिद्ध केली जाणार आहे. त्या यादीबाबत 30 दिवसांच्या मुदतीमध्ये हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत.त्यानंतर त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे.शहर फेरीवाला समितीने मान्यता दिल्यानंतर त्या विक्रेत्यांना पालिका परवाना देणार आहे.तसेच,फेरीवाला समितीच्या सदस्यपदासाठी निवडणूकही घेण्यात येणार आहे.