पथ विक्रेता सर्वेक्षणास 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
पिंपरी (वास्तव संघर्ष): महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणाची मुदत 30 नोव्हेंबर2022 पर्यंत होती परंतु पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्राची व्याप्ती लक्षात घेता कोणताही पथ विक्रेता या सर्वेक्षणातून वंचित राहू नये यासाठी पथ विक्रेता सर्वेक्षणास ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.
सर्वेक्षण विनामूल्य असून ते बायोमेट्रिक पद्धतीने होणार आहे. तसेच बायोमेट्रीक सर्वेक्षण हे प्रत्यक्ष जागेवरच होणार आहे. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिकाने क्षेत्रिय कार्यालय किंवा मुख्य कार्यालयाला भेट देण्याची आवश्यकता नाही. नोंदणी व सर्वेक्षण सुलभ पद्धतीने होण्यासाठी शहरातील संबंधित फेरीवाल्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकास आधारकार्ड लिंक (संलग्न) करून या सर्वेक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या शहरात कामगार, कष्टकरी तसेच उद्योजक यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने शहरातील पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण शासनाने विकसित केलेल्या हॉकर्स अॅपच्या माध्यमातून बायोमेट्रीक पद्धतीने करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण ऑनलाईन असल्यामुळे सर्वेक्षणावेळी मोबाईल संबधित फेरीवाल्यांच्या क्रमांकावर आलेला ओटीपी महत्वाचा असून तो महापालिकेच्या सर्वेक्षण प्रगणकास हे सर्वेक्षण करण्यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सकाळी 8ते रात्री 10 या वेळेत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
फेरीवाला सर्वेक्षणासाठी संबधित फेरीवाल्यांकडे आधारकार्डची छायांकित प्रत, रेशन कार्डचे पहिले पान व शेवटचे पान यांची एका पानावरील छायांकित असणे अनिवार्य आहे. आवश्यकतेनुसार जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत स्वतःजवळ असावी. दिव्यांग, घटस्फोटीता, परितक्ता महिलांसाठी अनुषंगिक पुराव्याची प्रत असणे गरजेचे आहे. फेरीवाल्यांना यापूर्वी पथविक्रेता प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्यांनी प्रमाणपत्र सादर करावे. यापूर्वी अतिक्रमण विभागाकडून काही कारवाई झाली असेल तर संबधित दंडाची पावती सोबत असणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडील लेटर ऑफ रेकमंडेशनची प्रत किंवा पीएम स्वनिधी कर्ज प्राप्त झाल्याचे कागदपत्रे तसेच कोविड 19 च्या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फेरीवाल्यांना देण्यात आलेला पास आदी कागदपत्रे संबंधित फेरीवाल्यांनी सर्वेक्षणावेळी स्वतःजवळ बाळगणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती फेरीवाल्यांनी सोबत ठेवाव्यात. तसेच आपला आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी संलग्र करून घ्यावा. आधार क्रमांक नसेल तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन आपली आधार नोंदणी पूर्ण करावी. हे सर्वेक्षण आधारकार्डशी संलग्न असल्याने मोबाईलवर येणारा ओ.टी.पी. फक्त सर्वेक्षण कामासाठी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकृत व्यक्तीस देणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. या कालावधीमध्ये जे पथ विक्रेते आपला सहभाग नोंदविणार नाहीत, त्यांची त्यानंतर कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही, अशी माहिती भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली.