Videoक्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

“तू शरीर विक्रीचा धंदाच कर…! पालिकेच्या अधिका-यांचे तृतीयपंथीयांना वादग्रस्त वक्तव्य

पिंपरी (वास्तव संघर्ष) : तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित व बेरोजगार तृतीयपंथीयांना हाताला काम मिळाले. मात्र तृतीयपंथीयांना मिळणा-या सन्मानाला अधिका-यांनेच ठेच पोहचवली आहे. शरीर विक्रीचा व्यवसाय सोडून तुम्ही महापालिकेत काम करता तसेच तत्कालीन आयुक्तांनी तुम्हाला डोक्यावर घेतले आहे. तुम्ही सेक्स वर्कर्सचा धंदाच करा करसंकलन विभागात थकबाकी वसुलीचे काम करणा – या तृतीयपंथीयांना असे धक्कादायक विधान केले आहे. अशा सहाय्यक आयुक्त विरोधात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी कार्यवाही करावी अशा तक्रारीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे करसंकलन विभाग प्रमुखावर आयुक्त कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेचे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त यांच्या विरोधात करसंकलन विभागात थकबाकी वसुलीचे कंत्राटी कामगार म्हणून काम करणारे बाळू उर्फ माधुरी वैरागे , उपेंद्र धाकपडे , महेश झेंडे , संगप्पा हेळवाड या चार तृतीयपंथीयांनी आयुक्तांकडे दाद मागितली आहे.करसंकलन चे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘ शलाका पथक ‘ म्हणून 10 तृतीयपंथीयांना कंत्राटी पद्धतीवर सुरुवातीला तीन महिन्यांसाठी 15 ऑगस्ट 2022 मध्ये सामावून घेण्यात आले होते . त्यावेळेस जेवढा कर वसूल होईल , त्याच्या एक टक्का रक्कम ही मानधन म्हणून या तृतीयपंथी यांना देण्याचे येईल असे सांगण्यात आले होते.

परंतु , कर वसूल झाल्यानंतर चेक ने पेमेंट करण्यात आलेल्या रक्कमेवर मानधन देण्यात आले . त्यामुळे कॅश , गुगल पे , आरटीजीएस द्वारे भरण्यात आलेल्या कररूपी रक्कमेवर पण मानधन मिळावे अशी मागणी या तृतीयपंथीयांनी सुरुवातीला चिखली विभागातील अधिकाऱ्यांकडे केली होती . त्यानंतर काहीच हालचाल झाली नाही म्हणून , या तृतीयपंथीयांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली होती . तेव्हा त्यांनी या लोकांना करसंकलन विभागाचे प्रमुखांची भेट घेण्यास सांगितले . तेव्हा या सर्व तृतीयपंथीयांनी करसंकलन विभाग प्रमुख यांची भेट घेतली असता , त्यांनी वरील आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तृतीयपंथीयांनी केला आहे.

नागरिकांकडून मालमत्ता कर ” वसुली ” मध्ये चांगली कामगिरी केल्याचे सांगत महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने आपल्या 10अधिकारी कर्मचाऱ्यांवर अक्षरशः 10 हजार ते 50हजार रोख बक्षिसांची खैरात केली आहे . मात्र , कर्मचाऱ्यांना रोख बक्षीस देण्याची मुंबई महापालिका अधिनियमामध्ये कोणतीच तरतूद नसल्याचे समोर आले आहे . नियमबाह्य पद्धतीने झालेली ही खैरात करण्यासाठी सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे . मात्र , तृतीयपंथी यांचा वापर करून चिखली करसंकलन विभागात सव्वा दोन कोटी रुपयांची वसुली केल्यावर आता त्यांचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप तृतीयपंथीयांनी केला आहे.दरम्यान याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्याशी संपर्क साधला असता दोघेही उपलब्ध झाले नाहीत.

Share this: