बातम्या

मर्जीतील ठेकेदारास पाणीपुरवठा विभागाची कामे; कार्यकारी अभियंता रामदास तांबेंचा मनमानी कारभार

खातेनिहाय चौकशी करण्याची आठ ठेकेदारांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

पिंपरी(वास्तव संघर्ष) चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विभागाच्या कामासाठी ठराविक आणि मर्जीतील एका ठेकेदारास काम मिळवून देण्याचे काम कार्यकारी अभियंता रामदास तांबे करीत आहेत. त्यासाठी इतर ठेकेदारांना जाणीवपूर्वक त्रास देत वाईट वागणूक दिली जात आहे. रामदास तांबे यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ ठेकेदारांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मंगळवारी (दि.20) केली आहे. ठेकेदारांच्या या तक्रारीची चर्चा पालिका वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

राजेश इंजिनअरर्स अ‍ॅण्ड कंपनी, राजलक्ष्मी स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, संत गाडगेबाबा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, जनसेवा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, श्री साई स्वयंरोजगार सहकारी संस्था, नॅशनल ग्रुप, अथर्व स्वयंरोजगार औधोगिक सेवा सहकारी संस्था, सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदार एजन्सींनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे ही तक्रार केली आहे. शहराची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के पूर्ण भरलेले असताना महापालिकेने शहरात पाणीकपात लागू केली आहे. शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळीत होऊन पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. विरोधकांसह सत्ताधारी प्रशासनावर या भोंगळ कारभारावर टीका करीत आहेत. अशा स्थितीत ठेकेदारांनी पाणीपुरवठा विभागावर आरोप केले आहेत.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तांबे यांच्याकडे ‘ब’, ‘ड’, ‘ग’ आणि ‘ह’ या 4 क्षेत्रीय कार्यालयाच्या पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्या अंतर्गत असलेल्या असलेल्या निविदा प्रक्रिया मंजूर करून ठराविक व मर्जीतील एका ठेकेदारास अदा केले जात आहे. हा प्रकार गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सुरू आहे, असा आरोप ठेकेदारांनी केला आहे.

मर्जीतील ठेकेदाराला निविदा प्राप्त होण्यासाठी तांबे हे स्वत: जातीने लक्ष घालतात. ठराविक ठेकेदारास काम कसे मिळेल याबाबत नेहमी प्रयत्न करतात. संबंधित ठेकेदारासोबत भागीदारी असल्याप्रमाणे ते काम करीत असल्याचा आरोप ठेकेदारांनी केला आहे. तांबे हे ठेकेदारांना बोलावून सदर ठेकेदारासोबत संगणमत करण्याबाबत सांगतात. इतर ठेकेदारांना त्रास दिला जात आहे, अशी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे तांबे यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे.

Share this: