क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ खुनाचा 27 वर्षांनंतर उलगडा

भोसरी(वास्तव संघर्ष): पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 27 वर्ष पोलिसांना गुंगारा देत नाव बदलून राहणाऱ्या एका आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केले आहे. ही कारवाई पोलिसांनी आरोपीच्या उस्मानाबाद येथील मूळ गावी जाऊन केली.

रामा पारप्पा कांबळे (वय-66, रा. कोळनुर पांढरी ता. लोहारा जि. उस्मानाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो 1995 पासून पत्नीचा खून करुन पसार झाला होता. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडी उकळ डोक्यात आणि छातीवर मारुन आरोपी रामा कांबळे याने 1995 मध्ये त्याची पत्नी सुशिलाबाई रामा कांबळे यांचा खून केला होता. खून करून तो पसार झाला होता. तसेच वारंवार पोलिसांना मागील 27 वर्षांपासून गुंगारा देत होता. या दरम्यान गुन्हे शाखा युनिट 1 चे एक पथक काही दिवसांपूर्वी 354मधील आरोपी महेश भिमराव कांबळे याला अटक करण्यासाठी आरोपी रामा कांबळे राहत असलेले गाव कोळनुर येथे गेले होते.

यावेळी पोलिसांनी महेश कांबळे याला अटक केली. तर रामा देखील याच गावचा असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी रामा याच्याबाबत गावात विचारपूस केली असता त्याने दुसरा विवाह केला असून नाव बदलून मावळातील उर्से येथे राम कोंडीबा बनसोडे या नावाने तेथील वीटभट्टीवर काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेचच उर्से येथे जाऊन आरोपी रामा कांबळे याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याने एका मुक्या महिलेसोबत विवाह केला असून त्याला तीन मुले असल्याचे सांगितले. तसेच 1995 साली भोसरी येथील राहत्या घरी त्यानेच त्याची पत्नी सुशिलाबाईचा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी रामा याला अटक केली असून पुढील कारवाईसाठी भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Share this: