पडळकर आणि जानकर यांच्या सभेला तुडुंब गर्दी
पिंपरी(वास्तव संघर्ष) :
येत्या २५ फेब्रुवारी रोजी धनगरांच्या मुलांच्या हातात एस.टी. आरक्षणाचा दाखला मिळाला नाही, तर भारतीय जनता पक्षाने सत्तेत यायचे स्वप्न पाहणे सोडावे. धनगर समाज घोडी-मेंढरासह मुंबईत चक्काजाम आंदोलन करेल, असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला. केवळ धनगर समाजाच्या मतांमुळे भाजप सरकार सत्तेवर आले. धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला जागा दाखविण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. सरकार आता फसवू शकत नाही, असेही ते म्हणाले.
सकल धनगर समाज, पिंपरी-चिंचवड यांच्यावतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित धनगर आरक्षण जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान, काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पडळकर म्हणाले, की घटनेत तरतूद असतानाही गेली सत्तर वर्षे आरक्षण मिळाले नाही. आता येत्या २४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्र्याांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला परिपत्रक पाठवून धनगर आणि धनगड् हे दोन शब्द एकच असल्याचे सांगून एसटी आरक्षणाचा दाखला द्यायला सांगण्यात यावा.
अन्यथा २५ फेब्रुवारीनंतर धनगरांची धग मुंबईकरांना लागल्याशिवाय राहणार नाही. २५ फेब्रुवारीनंतर धनगर समाज घोडी मेंढरासह मुंबईत चक्काजाम आंदोलन करेल. धनगर समाजात फार मोठी शक्ती आहे. पिपरी चिंचवड शहरात यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, गेल्या निवडणुकीत भााजपने सत्ता हस्तगत केली. पण हीच सत्ता येत्या निवडणुकीत धनगर समाज हालवूही शकतो. इथल्या दोन्ही आमदारांनी धनगर समाजाची फसवणूक केली आहे. निवडणुकीआधी धनगर आरक्षण आंदोलनात ते सहभागीही झाले होते. मात्र, निवडणुकीनंतर विधानसभेत धनगर आरक्षणाबद्दल एक शब्द्ही काढलेला नाही. त्यामुळे धनगर समाजाने आपली ताकद दाखवून द्यायला हवी. राज्यातील ४० मंत्रीपदे धनगरांमुळे आहेत, हे विसरू नये. घराणेशाही संपवा. आपण काय सालगडी आहोत का ? त्यामुळे कोणत्याही पक्षातील धनगर उमेदवाराला मत देण्याचे आवाहनही पडळकर यांनी केले.
मध्यप्रदेश सरकारने ज्याप्रमाणे गोंड गोवारी समाजाला परिपत्रक काढत आरक्षण दिले. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करावे. पुढील काळात आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशाराही पडळकर यांनी यावेळी दिला. सरकारने आदिवासी समाजाच्या नेत्यांची आमच्यासोबत एक तासाची बैठक घेतल्यास, आम्ही धनगर समाजाला आरक्षण देणे कसे शक्य आहे ते स्पष्ट करू, असेही पडळकर म्हणाले.
उत्तमराव जानकर म्हणाले, आता फार काळ वाट पाहावी लागणार नाही. हा लढा निश्चित जिंकू. आरक्षण देण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. आरक्षणाचा निर्णय न झाल्यास सरकारला घरचा रस्ता दाखवू. केंद्रासह राज्यातही भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल.
जागा दिल्याशिवाय अहिल्यादेवीचा पुतळा हटवू देऊ नका
मोरवाडी चौकातील अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा 5 गुंठे जागा देऊन स्मारक उभारल्याशिवाय हटवू देऊ नका, असे आवाहन पडळकर यांनी धनगर समाजाला केले.