भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पालिकेचा ढिसाळ कारभार उघड
पिंपरी(वास्तव संघर्ष) :क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे मंगळवारपासून (ता.11) विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाशेजारील मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पिंपरीतील या पहिल्याच दिवशी ठेवलेल्या कार्यक्रमाचे नियोजन ढिसाळ स्वरुपाचे पाहायला मिळाले आहे.मंगळवार सायंकाळी पाच वाजता ‘महामानवांना अभिप्रेत समतावादी समाज व्यवस्था व चित्रपट माध्यमांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद ठेवण्यात आला होता मात्र यासाठी बोलवण्यात आलेले प्रमुख पाहुणेच कार्यक्रमाला अनुपस्थित होते.त्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, अभिनेते सिद्धार्थ जाधव, सहभागी होणार होते मात्र हे प्रमुख पाहुणे अनुपस्थित राहील्याने याबाबत आंबेडकर जनतेतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .
11 एप्रिल या दिवशी महात्मा फुले यांची जयंती असल्याने हा दिवस बहुजन समाजातील अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो मात्र याच दिवशी पालिकेने कार्यक्रमात अशम्य चुका केल्या आहेत. प्रमुख पाहुण्यांना लाखोचे मानधन पालिकेने देऊन देखील ते का आले नाही? नागरिकांच्या कर स्वरूपातील हे लाखोचे मानधन आयोजक कसे भरून काढणार? जर प्रमुख पाहुणे येणार नव्हते तर पालिकेने आंबेडकर जनतेची फसवणूक का केली? हे सारे प्रश्न आंबेडकरी जनता विचारत आहेत. दरम्यान याबाबत आयोजकांना आम्ही फोन केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.