पिंपरी चिंचवडमध्ये अवैध धंदेवाल्याकडून पोलीस करतात हप्ता गोळा :विजय जरे
पिंपरी (वास्तव संघर्ष) : हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी तेथील आमदार प्रज्ञा सातव यांनी सभागृहात आवाज उठवताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे अवैध धंदे करणा-यांवर एमपिडीए अॅक्ट आणि मोक्का लावणार हे सभागृहात जाहीर केले.
हिंगोली प्रमाणे पिंपरी चिंचवड येथील अवैध धंदे करणा-यांवर पोलीस एमपिडीए अॅक्ट आणि मोक्का लावणार का? हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंदयांचा सुळसुळाट झाला असून, त्यामध्ये लॉटरी, मटका, मसाज पार्लर, अवैध दारू विक्री, नशेले पदार्थांचे विक्री, हुक्का, व इतर असे केले जात असून अवैध धंदेवाल्याकडून हप्ते गोळा करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक पोलिसाचीच नेमणूक करण्यात आली आहे असा गंभीर आरोप स्वराज्य पक्षाचे निमंत्रक विजय जरे यांनी केला आहे.
विजय जरे यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड ही औदयोगिकनगरी आहे, या शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी आणि अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यात आले, पण पोलिस आयुक्तालय सुरू होवुन त्याचा या शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी कोणताही फायदा झाल्याचे दिसत नाही. उलट या शहरात गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. अवैध धंदे हे पोलिसच्याच आशिर्वादाने सुरू आहेत. अवैध धंदेवाल्याकडून हप्ते गोळा करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक पोलिसाचीच नेमणूक करण्यात आली आहे, हे धक्कादायक आहे.
पोलिसांना हप्ते दिल्या शिवाय अवैध धंदे सुरू राहू शकत नाहीत. शहर व पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हेगारी वाढण्यास व अवैध धंदे सुरू राहण्यास पोलिसच जबाबदार आहेत. या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घेऊन शहरातील सर्व अवैध धंदे बंद करावे हप्ते गोळा करणाऱ्या पोलिसांवर किंवा त्यांच्या एजंटरवर खंडणी गोळा करण्याचे गुन्हे दाखल करावेत, त्याबाबत हप्ते गोळा केले जात असल्याचे पुरावे आपण स्वतंत्र तपास करून गोळा करावेत, शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी ठोस पावले न उचलल्यास तसेच अवैध धंदे बंद न केल्यास स्वराज्य संघटनेच्या वतीने शहरात जनआंदोलन उभरण्यात येईल.असे देखील निवेदनात विजय जरे यांनी म्हटले आहे.