राष्ट्रवादी काँग्रेसचे अनोखे आंदोलन प्रधानमंत्री वडापाव सेंटर सुरु करुन केला निषेध
पिंपरी (वास्तव संघर्ष ) केंद्र सरकारचे धोरण हे रोजगार वाढीला आणि उद्योग व्यवसायाला मारक आहे. त्यामुळे मागील चार वर्षात पंचेचाळीस टक्के रोजगारात घट झाली. नोटाबंदी मुळे तर छोटे उद्योग, व्यवसाय देशोधडीला लागले. नविन रोजगार निर्माण करण्याऐवजी मोदी सरकार सुशिक्षित बेरोजगारांना ‘पकोडे’ तळण्याचा सल्ला देत आहे. नविन उद्योग, व्यवसायांतील कर्ज, अनुदान, शिष्यवृत्ती, शिक्षण क्षेत्रातील अनुदान कमी करुन भांडवलदारांना लाखो कोटींचे कर्ज व अनुदान हे सरकार देत आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ असे फसवे आश्वासन देणा-या सरकारचा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तीव्र निषेध करीत आहे. अशी टिका पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केली.
पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने ‘पंतप्रधान बेरोजगार योजना अंतर्गत – प्रधानमंत्री वडापाव सेंटर’ सुरु करु केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (दि.७) प्राधिकरण निगडी येथे लोकमान्य टिळक पुतळा चौकात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी वडापाव सेंटरवर वडापाव विकले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शरद काळभोर, निलेश पांढारकर, कुणाल थोपटे, योगेश गवळी, हर्षवर्धन भोईर, शेखर काटे, भागवत जवळकर, सुनिल गव्हाणे, आलोक गायकवाड, मनोज वीर, सनी डहाळे, सतिश डोईफोडे, शिवराज रणवरे, चैतन्य चौरडिया, अमनजित दिपसिंग कोहली, साईश कोकाटे, श्रीरंग भोसले, प्रतिक नायगावकर, ऋषभ म्हेत्रे, मंगेश बजबळकर, हर्षद म्हेत्रे, हेमंत बडदे, आदित्य आडे, हेमल मुर्ती, आण्णा पिल्ले आदींसह बहुसंख्ये युवक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.