बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

चक्क पक्ष्यांसाठी राखून ठेवले अर्धा एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक 

वास्तव संघर्ष
चाकण(वार्ताहर) :
आपण घरात प्राणी, पक्षी पाळून त्यांना पाणी, चारा देऊन त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो. पण सद्यस्थितीत वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर खराबवाडीतील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर शिवराम कड या शेतकऱ्याने अर्धा एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक चक्क पक्ष्यांना खाण्यासाठी राखून ठेवले आहे. ज्वारीच्या उत्पन्नाचा त्याग करून त्यांनी दाखविलेल्या पक्षिमायेचे पक्षिप्रेमींतून कौतुक होत आहे.
           ज्ञानेश्वर कड यांची खराबवाडी (चाकण) परिसरात चार एकर शेती आहे. यातील अर्धा एकर क्षेत्रात त्यांनी ज्वारीचे पीक घेतले आहे. या सर्व क्षेत्रांतील ज्वारीचे उभे पीक कड यांनी पक्ष्यांसाठी राखून ठेवले आहे. सध्या त्यांच्या ज्वारीच्या पिकात अनेक प्रकारचे पक्षी सकाळ-संध्याकाळ येत असतात. काही पक्ष्यांनी तर या ठिकाणी असलेल्या मोठ्या झाडांवर आपली घरटी केली आहेत. कड यांनी शेजारीच असलेल्या नारळाच्या झाडांना मडकी बांधली आहेत. जेणेकरून पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे. चारा, पाणी मुबलक मिळत असल्याने पक्ष्यांचे थवेच्या थवे या ठिकाणी पाहायला मिळतात.
        ज्वारीच्या या क्षेत्रातून कड यांना ८ते १०क्विंटल ज्वारीचे उत्पादन मिळाले असते. मात्र, उत्पन्नाचा विचार न करता त्यांनी ज्वारीचे उभे पीक पक्ष्यांसाठी उपलब्ध करून पक्ष्यांविषयी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या या पक्षीप्रेमाचे चाकण परिसरात कौतुक होत आहे.
 
 
“आज राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे उन्हात पक्ष्यांना चारा पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. तसेच वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या राहण्याबरोबरच त्यांच्या खाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतातील ज्वारीचे पीक पक्ष्यांना दान करण्याचा निर्णय घेतला. ज्वारीच्या उत्पादनाचा त्याग करून ते पक्ष्यांसाठी राखून ठेवत आहे.”   
                    – ज्ञानेश्वर कड, प्रगतशील शेतकरी
Share this: