भोसरी पोलिसांकडून ३० किलो गांजा जप्त, एकाला अटक
वास्तव संघर्ष भोसरी – पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना दोन संशयित भोसरी गावठाण येथे गांजा विकण्यासाठी आले असल्याची माहिती पोलीस कर्मचारी समीर रासकर व सुमित देवकर यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असता भोसरी पोलिसांनी परिसरात सापळा रचला. त्यावेळी पोलिसांना संशयित मोटार दिसली.
संशयित स्विफ्ट मोटार (एमएच १२ एलजे १९०५) अडवली असता त्यातील एकजण पसार झाला तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तरेश्वर उर्फ बॉक्सर दगडू कांबळे (वय ५४, रा.गुळवे वस्ती, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
आरोपींच्या मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये १० लाख ०७ हजार ३९४रुपये किमतीचा ३० किलो ४३५ग्रॅम गांजा मिळाला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, कर्मचारी गणेश हिंगे, विपुल जाधव, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, आशिष गोपी, सागर भोसले, बाळासाहेब विधाते या पथकाने कारवाई केली.