‘माझं लग्न माझ्या कामाशी झालंय’-राहुल गांधी
पुणे – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज शुक्रवारी पुण्यात हडपसर येथे मगरपट्टा सिटीमध्ये पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी राहुल गांधी यांची मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची राहुल यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, आज मी जिथे उभा आहे, तिथे पंतप्रधानांनी उभं राहायला हवं की नाही ? त्यांनी तुमच्या प्रश्नांना सामोरं जायला हवं की नको ? पण ते तसं करणार नाहीत, कारण त्यांना प्रश्न नको आहेत. राजकारण्यांनी वयाच्या कितव्या वर्षी निवृत्त व्हावं? या प्रश्नावर राहुल यांनी राजकारण्यांनी सुद्धा निवृत्त व्हायला हवं. त्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्ती घ्यावी, असं राहुल म्हणाले.
तुम्ही लग्न कधी करणार? असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारताच ‘माझं लग्न माझ्या कामाशी झालंय’ असे त्यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. प्रियांका गांधी या माझी सर्वात जवळची मैत्रिण असल्याचंही ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या मुलाखतीमधील महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
आज देशात २४तासाला २७हजार नोकऱ्या गमावल्या जात आहेत, तर चीनमध्ये सातत्याने रोजगाराची निर्मिती होत आहे. कारण आपल्याकडे स्किलला महत्त्व दिलं जात नाही. हे चित्रं बदलायला हवं. त्यासाठी इको सिस्टिम बनवण्याची गरज आहे.
विद्यापीठं आणि कंपन्यांमध्ये अंतर असून त्यांना एकत्र जोडल्यामुळे नोकऱ्या वाढतील.
गरिबांना वर्षाला ७२ हजार रुपये देण्यासाठी विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी आणि अनिल अंबानीकडील पैसा आणला जाईल, मध्यमवर्गीयांवर कोणताही कर आकारण्यात येणार नाही
जीएसटी आणि नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. आम्ही सत्तेत आल्यास अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणार
एअर स्ट्राइकचे श्रेय हवाई दलाचे आहे. त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे योग्य नाही