थेरगावात टोळक्यांचा राडा, लोखंडी कोयते आणि हॉकी स्टीकने तरूणावर प्राणघातक हल्ला
काळेवाडी(वास्तव संघर्ष) थेरगाव फाटयाजवळील लक्ष्मी ट्रेडर्स येथे मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या एका तरुणावर ८ ते ९ जणांच्या टोळक्याने लोखंडी कोयते आणि हॉकी स्टीकने राडा घालत प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इंद्रजित आनंदराव माने (२५, रा. श्रीकृष्ण कॉलनी, थेरगाव फाटयाजवळ, थेरगाव) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अजय तुकाराम खानेकर (२६, रा. चौथा मजला, श्रीकृष्ण कॉलनीचे बाजुला, थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ८ ते ९ अज्ञातांविरूध्द खुनाचा प्रयत्नासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अजय खानेकर हे त्यांचे मित्र इंद्रजित माने, महेश कुंभारकर, किरण गोरे, कार्तिक आणि प्रथमेश किरण येवले हे गप्पा मारत थांबलेले होते. त्यावेळी तीन ते चार दुचाकीवरून आलेल्या 8 ते 9 जणांनी घातक हत्यारांनी तेथे असलेल्यांवर हल्ला चढविला. अजय खानेकर यांचे मित्र तेथुन जीव वाचविण्यासाठी पळुन गेले. खानेकर हे आरोपींच्या तावडीत सापडल्याने आरोपींनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने सपासप वार करण्याचा प्रयत्न केला असता खानेकर यांनी त्यांचे दोन्ही हात मध्ये घातले. गंभीर दुखापत होवुन ते खाली पडल्यानंतर आरोपींनी पुन्हा त्यांच्या पायावर कोयत्याने सपासप वार केले. काही वेळानंतर आरोपींनी तेथुन पळ काढला.
आरोपींनी घातलेल्या राडयाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहे. पोलिस सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या फुटेजवरून आरोपींचा शोध घेत आहेत. गुन्हयाचा पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.