बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

सत्ताबदल होऊन महाआघाडीचे सरकार केंद्रात सत्तेत येईल : डॉ. रत्नाकर महाजन

पिंपरीत असंघटीत कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यालयाचे उद्‌घाटन

पिंपरी (वास्तव संघर्ष ) : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 23 मे ला आहे. त्या नंतर देशात सत्ताबदल होऊन केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येईल. त्यानंतर असंघटीत कामगार व समाजातील दुर्लक्षित घटकांबाबत कॉंग्रेस काम करेल, असे प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी सांगितले.

पिंपरीत मंगळवारी (7 मे) असंघटीत कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर कार्यालयाचे उद्‌घाटन डॉ. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी असंघटीत कामगार कॉंग्रेसचे जिल्हा निरीक्षक रमेश व्यास, निरीक्षक पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सचिन साठे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, असंघटीत कामगार कॉंग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, शहराध्यक्षा शीतल कोतवाल, प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस मयूर जैसवाल, लक्ष्मण रूपनर, ॲड. अनिरूद्ध कांबळे, विशाल कसबे, परशुराम गुंजाळ, मकरध्वज यादव, चंदा ओव्हाळ, निर्मला कुसाळकर, तारीक सय्यद, नितीन पटेकर, मनोहर वाघमारे, संखेश ओव्हाळ, पूजा चिंडालिया, सीमा वाल्मिकी, मंदा भवार, शोभा कानगुडे, फातिमा शेख, सविता धांडे, सत्वशिला ईटकर आदींसह शहर कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ. महाजन म्हणाले की, देशभर असंघटीत कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांच्या कल्याणासाठी संयुक्त पूरोगामी आघाडीचे (यूपीए) तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अर्जूनसेन गुप्ता यांची राष्ट्रीय कमिटी स्थापन करण्यात आली. असंघटीत याचा अर्थ स्वत:च्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी कोठेही नोकरी न करता स्वयंरोजगार करणारी व्यक्ती. परंतू त्यांना आरोग्य, विमा व भविष्य निर्वाह निधीसारख्या सुविधा उपलब्ध नसतात. अशा व्यक्तींना सुविधा मिळवून देण्याचे काम युपीए सरकारने केले. 2014ला झालेल्या निवडणुकीत निव्वळ 31 टक्के मतदान मिळविणारे एनडीएचे सरकार सत्तेत आले. या सरकारने ‘असंघटीत कामगार’ याविषयावरील चर्चादेखील बंद केली. मात्र 23 मे च्या होणा-या सत्तांतरानंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार सामान्य माणसाच्या उपयोगी असणा-या योजना जोमाने सुरु करून त्याची अंमलबजावणी करेल. त्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जागल्याचे काम करून या योजनांचा लाभ तळागळातील गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविला पाहिजे. सरकार व गरजू लाभार्थी यांच्यातील दुवा म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी काम करावे, असे मार्गदर्शन डॉ. महाजन यांनी केले.

उपस्थितांचे स्वागत करताना शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले की, असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या माध्यमातून सुंदर कांबळे यांनी मागील वर्षभरात शहरात वेळोवेळी असंघटीत कामगारांच्या हक्कांसाठी उपोषण, आंदोलन करून जनजागृती केली. अनेक ठिकाणी त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला. आगामी काळातही त्यांच्याकडून असेच काम होईल अशी अपेक्षा साठे यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक सुंदर कांबळे, सुत्रसंचालन शीतल कोतवाल, तर आभार नितीन पटेकर यांनी मानले.

Share this: