मोदी सत्तेवर येताच आश्वासनांची पूर्तता करतील ते पुन्हा थापा मारणार नाहीत – रामदास आठवले
नांदेड : सत्तेवर येताना जी आश्वासने पंतप्रधान मोदी यांनी दिली आहेत, आणखी पाच वर्षांचा कालावधी त्यांना ते पूर्ण करण्यासाठी लागणार असल्यामुळे ते सत्तेवर पुन्हा येताच आश्वासनांची पूर्तता करतील. पुन्हा ते थापा मारणार नाहीत असे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एका प्रश्नांवर बोलताना म्हटले. नांदेड येथे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते आले आहेत.
आठवले यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना राज्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण असल्याचे सांगताना राज्य सरकार उपाययोजना करीत असल्याचे सांगितले. केंद्राकडूनही यासाठी मदत केली जात आहे. त्याचवेळी दुष्काळ निवारणासाठी सिंचन क्षेत्र वाढविण्याची गरज आहे. नव्या उद्योगांची उभारणी करावी तसेच शेतीला जोडधंदाही आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
तसेच दोन हजार कोटींचा निधी केंद्र सरकारने राज्याला दुष्काळ निवारणासाठी दिल्याचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले होते, प्रत्यक्षात ही मदत मिळालीच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्रीही याबाबत मोदींच्या पावलावर पाऊल टाकत आहेत काय असे विचारले असता त्यांनी पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर येताना जी आश्वासने दिली आहेत, ते पूर्ण करण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ते पुन्हा सत्तेवर येताच आश्वासनांची पूर्तता करतील ते पुन्हा थापा मारणार नाहीत असे म्हटले.