कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांचे पद रद्द करावे 

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपळे गुरव येथे अतिक्रमनांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला सत्ताधारी नगरसेवकांकडून फोन करून कारवाई न करण्याबाबत धमकाविण्यात आले. त्यामुळे या पथकाला कारवाई न करताच परतावे लागले, ही नामुष्कीजनक गोष्ट आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी ‘त्या’ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करावे. तसेच कारवाईत दुजाभाव करीत असलेल्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,

अशी मागणी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. कायद्यात तरतूद असून, सेक्शन 44 अंतर्गत आयुक्तांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना अरुण पवार यांनी सांगितले, की मुळात महापालिका प्रशासन स्वतंत्रपणे आपले कर्तव्य बजावीत असते. मात्र, अलीकडे महापालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचताना दिसत आहे. हे चुकीचे आहे. अधिकारी अतिक्रमण हटविण्याची कामे तटस्थपणे करीत नसल्याबाबत हेच नगरसेवक महापालिका सभागृहात आरडाओरडा करीत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमण विरोधी कारवाई करताना अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी दुजाभाव करताना दिसतात. दोन महिन्यांपूर्वीही पिंपळे गुरव येथील ठराविक पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. आज पिंपळे गुरवमध्ये नदीपात्रालगत शंभरहून अधिक अनधिकृत पत्राशेड आहेत. मात्र, केवळ सत्ताधारी नगरसेवकांच्या दबावामुळे अधिकारी कारवाईस टाळाटाळ करतात. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच अतिक्रमण विरोधी पथकावर फोन करून दबाव आणलेल्या संबंधित नगरसेवकांवर कारवाई करून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे.

आज संपूर्ण शहरातच अतिक्रमनांचे पेव फुटले आहे. अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारी याकडे गंभीरपणे पाहत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. राजकारणी लोक सांगतील त्या अतिक्रमनांवर कारवाई करताना दिसतात. हेच राजकारणी लोक सभागृहात मात्र या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी तावातावाने बोलतात. सभागृहाबाहेर मात्र याच्या उलट वागतात. पिंपळे गुरवमधील ठराविक पत्राशेडवर कारवाई करा, या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी काही नगरसेवक आयुक्तांसमोर ठाण मांडून बसले होते. त्यानुसार अतिक्रमणविरोधी पथकाने शंभर पत्राशेडपैकी केवळ चार पत्राशेडवर कारवाई केली. मंगळवारी अतिक्रमणविरोधी पथक सर्व लवाजम्यासह कारवाईसाठी पिंपळे गुरवमध्ये आले होते. मात्र, विद्यमान नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना फोन करून कारवाई टाळण्यासाठी धमकावले. त्यामुळे हे पथक कारवाईविनाच परतले. ही नामुष्कीजनक गोष्ट आहे, असेही पवार यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना धमकावत कारवाईला विरोध करणाऱ्या नगरसेवकांची नावे महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून घ्यावीत. आणि या नगरसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी अरुण पवार यांनी केली.

 

Share this: