प्रशासकीय ‘नेमप्लेटवर’ आयुक्त श्रावण हर्डीकरांची नेमप्लेट भाजप प्रवक्ते;राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व प्रशासकीय प्रोटोकॉल मोडीत काढल्याने आणि प्रशासकीय शिष्टाचार बाजूला करत भाजप कार्यालयात जाऊन बंद दाराआड भाजप पक्षाच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यक्रमास आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी ‘गुफ्तगू’ केले.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त राजकीय पक्षाच्या कार्यालयात गेले आहेत. यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर हे भाजपचेच प्रवक्ते असल्याचे सिध्द होते. महापालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांनी येणे अपेक्षित असताना स्वत: आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांची ‘सरबराई’ केली. शिष्टाचाराप्रमाणे गैरपक्षीय ठिकाणी आयुक्तांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करणे अपेक्षित असते. याचाच खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या महानगरपालिकेतील नेमप्लेट बदलून भाजप प्रवक्ते असा बदल केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मयुर कलाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आयुक्त श्रावण हर्डीकर जर भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांशी बंद दाराआड ‘गुप्तचर्चा’ करतात तर त्यांनी प्रशासकीय लवाजमा न घेता भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते व्हावे म्हणून त्यांना त्यांची प्रशासनाने दिलेली नेमप्लेट काढून आम्ही भाजप प्रवक्ते अशी नेमप्लेट केली आहे .
या अनोख्या स्टाईलने केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, नगरसेवक मयुर कलाटे, नगरसेवक राहूल भोसले, नगरसेवक जावेद शेख, नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक राजू बनसोडे, नगरसेवक विनोद नढे आदी उपस्थित होते.