क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भोसरीतील आत्महत्येला वेगळे वळण:दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

पिंपरी: भोसरी येथील नूर मोहल्ला येथे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक बाब समोर आली आहे . गळफास देऊन हत्या केलेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

त्यामुळे ही घटना आर्थिक विवंचनेतून घडली नसल्याचं उघड झालं आहे. अक्रम बागवान आणि त्याची पत्नी फातिमा हे चार मुलांसह पुण्यात स्थायिक झाले होते. अक्रम यांचे कुटुंब मुळचे कर्नाटकचे आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी ते पुण्यात आले होते. अक्रम वारजे, तळेगाव दाभाडे येथे फळविक्रीचा व्यवसाय करत होता. तेथेही व्यवसाय चालत नसल्याने तो फातिमा आणि मुलांना घेऊन चारच दिवसांपूर्वी भोसरीतील नूर मोहल्ला येथे राहण्यासाठी आला. रविवारी सकाळी फातिमा हिने अक्रमला कामधंदा शोधण्यासाठी घराबाहेर पाठवले होते. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास तो घरी परतला. त्यावेळी घराचे दार आतून बंद होते. बराच वेळ दार ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर घरमालकाने पोलिसांना कळवले. त्यानंतर भोसरी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी घराचे दार तोडले. त्यावेळी अलफिया, झोया आणि जिआन ही तीन मुले छताच्या हुकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आतल्या खोलीत फातिमा हिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली होती. घरात कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येमागील कारण समजू शकले नव्हते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र, मुलींच्या गुप्तांगातून रक्तस्राव सुरू होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. भोसरी पोलीस ठाण्यातील दोन अधिकारी शवविच्छेदन होईपर्यंत रुग्णालयातच थांबले होते. आज सकाळी शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल मिळाला असून, गळफास देऊन हत्या केलेल्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलींवर अत्याचार कोणी केले? त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून एका नातेवाईकाला ताब्यात घेतले आहे.

Share this: