माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रात्री ९ वाजण्याचा सुमारास स्वराज यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या, बेशुद्धावस्थेत त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
सायंकाळी ७ वाजता सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन जम्मू-काश्मीरमधून कलम ३७०हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं.
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्रमंत्रीपद भूषवले होते. प्रकृती खालावल्यामुळे स्वराज यांनी यावर्षीची लोकसभा निवडणूक न लढण्याचे ठरवले होते.
सुषमा स्वराज या १९९० साली पहिल्यांदा खासदार झाल्या. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १३दिवसांच्या सरकारमध्ये त्या माहिती प्रसारण मंत्री होत्या. १९९८ साली त्यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्या दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या.