बातम्या

संकटकाळात नागरिकांना मदत करणे हे माझे कर्तव्य;पूरग्रस्तांना शेखरभाऊंचा मदतीचा हात!

पिंपरी(वास्तव संघर्ष) पुणे, मावळसह पिंपरी-चिंचवड परिसरात सध्या मुसळधार पावसामुळे ‘आसमानी’ संकट झेलणा-या नदीकाठच्या नागरिकांना ढिम्म प्रशासनाच्या ‘सुलतानी’ कारभाराचेही फटके बसत आहेत. या पार्श्वभूमीवर माणुसकी दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार शेखर ओव्हाळ यांनी ”शेखर ओव्हाळ युवा मंच’तर्फे पूरबाधितांना मदतीचा आश्वासक हात देत जेवणाची सोय केली.

पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी शेखर ओव्हाळ यांनी केलेल्या मदतीमुळे समाधान व्यक्त केले.मुसळधार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरात रविवारपासून पूरस्थिती निर्माण झाली असून रविवारपासून राष्ट्रवादीचे शेखर ओव्हाळ यांनी शहरातील नदीकाठच्या भागांना भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला तसेच पूरबाधितांना मदतीचा हात देऊन माणुसकी जपली. मागील चार-पाच दिवसांपासून मुसळधार पावसामुळे तसेच पवना धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग होत असल्याने दापोडी, कासारवाडी गावांमधील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे संबंधितांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासकीय पंचनामे होऊन मदत मिळण्याची वाट न पाहता कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वत: गुडघाभर पाण्यात उतरुन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांची सोय ओव्हाळ यांनी केली. तसेच या सर्व लोकांना जीवनावश्यक वस्तू, ब्लँकेट, खाद्यपदार्थ यांचे वाटप केले.

कासारवाडी येथील उर्दू विद्यालय, फुगेवाडी येथील कै. मीनाताई ठाकरे विद्यालय आणि दापोडीतील हुतात्मा भगतसिंग शाळेत सोय केलेल्या नागरिकांना ब्लँकेटचे वाटप केले. पिंपरी येथील गांधीनगर तसेच भाटनगर भागातील पूरबाधितांना जेवणाचे वाटप करीत माणुसकी जपली. गेल्या काही दिवसात मुसळधाार पावसामुळे पवना धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून शहरातील नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र या कामी शासकीय यंत्रणेची मदत कुचकामी ठरत असून आपण स्वत: नागरिकांच्या मदतीला धावले पाहिजे असा ठाम निर्धार करुन शेखर ओव्हाळ यांनी पुढाकार घेतला आणि नागरिकांना मदत केली. पूरसदृश स्थितीमुळे कासारवाडी, दापोडी, फुगेवाडी भागातील नदीकाठच्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशाप्रसंगी शासकीय मदतीच्या भरवशावर न राहता स्वत: घरोघरी पोहोचून ओव्हाळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत पूरग्रस्तांना मदत केली.

याप्रसंगी बोलताना शेखर ओव्हाळ म्हणाले, ‘संकटकाळात नागरिकांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. ढिम्म प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना वेळेवर मदत मिळू शकत नाही हे मी अनुभवले असल्यामुळेच आपण लोकांची सोय करायची असा निश्चय केला.’ बाधित नागरिकांनी मदतीसाठी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन ओव्हाळ यांनी यावेळी केले. याप्रसंगी शेखर ओव्हाळ युवा मंचचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this: