उदयनराजे राष्ट्रवादी कॉग्रेस सोडणार ;लवकरच भाजपात प्रवेश करणार
वास्तव संघर्ष आॅनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणून आलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. दिल्लीतच राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
प्रवेश बुधवारी (दि. ३ सप्टेंबर) किंवा गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) रोजी करायचा, याबाबत उदयनराजे लवकरच निर्णय घेणार आहेत. तसेच उदयनराजेंचा भाजप प्रवेश निश्चित झाल्यानेच त्यांनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये हजेरी लावली नसल्याचे बोलले जात आहेत.उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सलग दहा वर्षे खासदार राहिले आहेत . लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून येऊन त्यांनी हॅट्ट्रिकही साधली.
राष्ट्रवादीत असताना त्यांचे व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कधीच पटले नाही. केवळ शरद पवार यांच्या प्रेमापोटी ते राष्ट्रवादीत राहिले. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीनंतर देशाचे व राज्याचे चित्र बदललेले दिसल्यानंतर उदयनराजेंनाही नवी राजकीय दिशा खुणावू लागली. मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व उदयनराजेंची चांगली मैत्री आहे. यामुळे त्यांनी साताऱ्याला भरघोस निधी देखील दिला होता.