चिंचवड रेल्वे स्थानकातील आश्चर्यचकित घटना.. रेल्वे इंजिन अंगावरून जाऊनही तो बचावला..!
पिंपरी ( वास्तव संघर्ष ) :- चिंचवड रेल्वे स्थानकातील रुळावर एक व्यक्ती चक्कर येऊन पडली. त्यानंतर लगेचच तिच्या अंगावरुन रेल्वे इंजिन गेले. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने ही व्यक्ती आश्चर्यकारकरित्या बचावली. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश भागवत माळी (वय ३८) असे सुदैवाने बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश भागवत माळी (वय ३८) असे या व्यक्तीचे नाव असून ते मूळचे मध्यप्रदेश येथील असून कामाच्या शोधात पुण्यात आले आहेत. प्रकाश आज सकाळी चिंचवड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून जात असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते थेट प्लॅटफॉर्मजवळच्या रेल्वेमार्गावर पडले, तेवढ्यात एक रेल्वे इंजिन त्याच्या अंगावरून गेले. मात्र, दोन रुळांच्यामध्ये ते पडल्याने सुखरूप बचावले.
प्रकाश हे चिंचवड येथे आले आहेत, काम मिळत नसल्याने काही दिवसांपासून उपाशी होते. अशा परिस्थितीत चिंचवड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉम नंबर तीनवरुन जात असताना चक्कर येऊन ते थेट रेल्वे रुळांच्यामध्ये पडले.
इंजिन पुढे गेल्यानंतर ही थरारक घटना पाहिलेल्या प्लॅटफॉर्मवरील काही प्रवाशी आणि पोलिसांनी प्रकाश यांना बाजूला घेतले. घाबरलेल्या प्रकाश यांनी पोलिसांना आपण उपाशी असल्याने चक्कर आल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नाष्टापाण्याची सोय केली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दरम्यान, त्यांना प्राथमिक तपासणीसाठी रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. रेल्वे पोलीस कर्मचारी अनिल बागूल यांनी तातडीने प्रकाश यांना मदत केल्याने त्यांचा जीव वाचू शकला.