स्पर्धा परीक्षेत पिंपरी चिंचवड पालिकेच्या चार विद्यार्थ्यांचे उत्तम यश
पिंपरी (वास्तव संघर्ष): महाट्रान्स्को, डीआरडीओ तसेच केंद्रीय रेल्वे विभागाने नुकत्याच घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चार विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करून अधिकारी पद संपादन केले असल्याने त्यांचा महानगरपालिकेस सार्थ अभिमान वाटत असल्याचे मत क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजीनगर येथील साई उद्यानातील भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा केंद्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभा प्रसंगी क्षेत्रीय अधिकारी पानसरे बोलत होत्या.या कार्यक्रमास क्षेत्रीय कार्यालयातील विजयश्री देसाई, राजीव मोहन, सुरेखा मोरे, नलिनी मोजे, प्रतिभा मुनावत, रामदास जाधव ,राजेंद्र आंभेरे,सुभास घुतुकुडे, राजू दाभाडे, प्रवीण चाबुकस्वार,वैशाली थोरात ,कांचन कोपर्डे, वर्षा जाधव व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
आज झालेल्या या कार्यक्रमात डीआरडीओ संस्थेत सीनियर टेक्निकल असिस्टंट या पदावर नियुक्ती झालेल्या दत्तात्रय शिवाजी ढवळे यांचा, महाट्रान्सको मध्ये असिस्टंट इंजिनियर या पदावर नियुक्ती झालेल्या बालाजी कुंडलीक कांबळे, विध्याधर शिंदे, महाराष्ट्र रेल्वे ग्रुप डी या पदावर नियुक्ती झालेल्या विशाल हंडरगुळे यांचा क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .यावेळी जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक,ग्रंथपाल राजू मोहन आदींनी मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संभाजीनगर येथील उद्यानामध्ये माजी राष्ट्रपती,भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा केंद्र सातही दिवस सकाळी सात ते रात्री दहापर्यंत सुरू असते.2017 पासून सुरू असलेल्या या स्पर्धा परीक्षा केंद्रातून अनेक विद्यार्थी यूपीएससी व एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. या केंद्रात अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात येतात . परीक्षा काळात अनेक वर्तमान पत्र, साप्ताहिके , मासिके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात. येथे विविध पुस्तकांसह वाय-फाय सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशामक यंत्रणा, इन्वर्टर इत्यादी सुविधा या स्पर्धा परीक्षा केंद्रात उपलब्ध करून दिलेले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश निघोज व नीलम गाढवे यांनी केले