संभाजी बिग्रेडसह नागरी हक्क सुरक्षा समितीचा अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठींबा जाहीर
पिंपरी – पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांना मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या वतीने काल (सोमवारी) पाठिंबा देण्यात आला. तसेच नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे यांनीही कलाटे यांना पाठींबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेड, नागरी हक्क सुरक्षा समितीचेही पाठबळ मिळाल्याने कलाटे यांचे पारडे जड झाले आहे.
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातून सर्वपक्षीयांचे उमेदवार म्हणून दंड थोपटले आहेत. मतदार संघातील उच्चशिक्षित उमेदवार म्हणून त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पदयात्रा, रॅलींना होणारी गर्दी, मतदार संघातील सोसायट्यांकडून मिळालेला पाठिंबा यामुळे कलाटे यांनी चर्चेचा नूर पालटून टाकला आहे. कलाटे यांची मतदार संघातील वाढती ‘क्रेझ’ तसेच सुशिक्षित व सर्वमान्य उमेदवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने कलाटे यांना पुरस्कृत केले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ काँग्रेस आणि मनसेने देखील कलाटे यांच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका घेतली. कलाटे यांच्या मागे सर्वपक्षीय एकवटल्याचे चित्र असतानाच सामाजिक संघटनांकडूनही त्यांना पाठिंब्याचा ओघ वाढला झाला आहे.
मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडच्या वतीने संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा सचिव विशाल जरे, जिल्हा संघटक लघु लांडगे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर लोभे, शहर संघटक रशिदभाई सय्यद, विनोद घोडके, वैभव जाधव यांनी राहुल कलाटे यांना पत्राद्वारे बिनशर्त पाठिंबा दिला.
शास्तीकर, रिंग रोड, अनधिकृत बांधकाम हे प्रश्न सोडवतो असे सांगून सत्तेत आलेल्या विद्यमान आमदारांनी यातील एकही प्रश्न आजपर्यंत सोडविला नाही. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आलेले भाजप सरकार मराठा बहुजन समाजाचे शोषण करीत आहे. मोदी, फडणवीस सरकारच्या काळात शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्यांची आकडेवारी अनेक पटीने वाढली आहे. फसव्या कर्जमाफीचे गाजर दाखवून शेतकर्यांचा आवाज दाबला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागतात, शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात बांधू असे आश्वासन देणार्या या सरकारने स्मारकाची एकही विट रचली नाही. मात्र, काम सुरु होण्यापूर्वीच 80 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप होत आहेत. इंदु मिल मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करून तिथेही एक विट देखील रचली गेलेली नाही. तसेच शहरातील वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, रस्त्याची दुरवस्था, पाण्याचा प्रश्न, आर्थिक मंदी याला सर्वस्वी भाजप सरकार जबाबदार असून याविरोधात राहुल कलाटे यांना पाठिंबा देत असल्याचे मराठा सेवा संघ संभाजी बिग्रेडने नमूद केले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवार राहूल कलाटे यांनी काल सोमवारीही जोरदार प्रचार केला. विविध सोसायट्यांमध्ये बैठका, कार्यकर्ते नागरिकांशी संवाद साधत चिंचवडच्या विकासासाठी संधी देण्याचे आवाहन केले. दिवसेंदिवस कलाटे यांच्या प्रचारास वाढता पाठींबा मिळत असल्याने प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.