भोसरीत कमळाबाईवर धनुष्यबाण रूसलं ;प्रचाराबाबत संतप्त भावना व्यक्त करत काम न करण्याचा शिवसैनिकांचा इशारा
भोसरीत कमळाबाईवर धनुष्यबाण रूसलं ;प्रचाराबाबत संतप्त भावना व्यक्त करत काम न करण्याचा शिवसैनिकांचा इशारा
पिंपरी:- राज्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप आघाडी आहे माञ भाेसरी विधानसभेत शिवसैनिकांनी धनुष्यबाणाने कमळावर नाराजी व्यक्त केली आहे ‘आम्हाला विश्वासात घेत नाहीत असा आरोपही त्यांनी केला त्यामुळे भोसरीत कमळचा प्रचार लांबूनच पहात धनुष्य हसून मजा घेताना दिसत असल्याची बाब समाेर आली असुन धनुष्य बाण सोडणार का कमळाची साथ? तसे झाले तर महेश लांडगे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्याकडून शिवसेनेला विश्वासात घेतले जात नसल्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या निगडी, यमुनानगर येथील निवासस्थानी सोमवारी (दि. १४) बैठक झाली. या बैठकीत शिवसैनिकांनी भाजपच्या प्रचाराबाबत संतप्त भावना व्यक्त करत काम न करण्याचा इशारा दिला. आमदार लांडगे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेला गेले नाहीत, प्रचार पत्रकावर बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा वापर केला जात नाही, काही प्रचार पत्रकावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र जाणूनबूजून गायब केले जाते, अशा तक्रारी शिवसैनिकांनी बैठकीत केल्या. तसेच आमदार लांडगे यांचे काम करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे भोसरी मतदारसंघात शिवसेना आणि भाजपमध्ये काडीमोड झाल्यात जमा आहे अशी चर्चा मतदार संघात सुरु आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात दोन दिवसांपूर्वी जाहीर सभा झाली. या सभेला महायुतीचे उमेदवार म्हणून भोसरी मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र आमदार लांडगे यांनी सभेला दांडी मारून थेट उद्धव ठाकरे यांनाच फाट्यावर मारले. त्यावरून शहराच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या.
उद्धव ठाकरे यांच्या सभेला अनुपस्थित राहण्याची गंभीर चूक केल्यानंतर आता भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारात शिवसैनिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गृहित धरून जाणूनबूजून डावलले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघात शिवसेनेमध्ये महेश लांडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविषयी प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यातून शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या निगडीतील निवासस्थानी भोसरी मतदारसंघातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सोमवारी सकाळी बैठक झाली. या बैठकीला सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, धनंजय आल्हाट, निलेश मुटके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीत शिवसैनिकांनी भोसरी मतदारसंघातील प्रचार पद्धतीवरून तीव्र संताप व्यक्त केला..
भाजप उमेदवार महेश लांडगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सरळसरळ डावलले जात असल्याचा राग शिवसैनिकांनी व्यक्त केला. यासंदर्भात सुलभा उबाळे यांना संपर्क केला असता आमची बैठक झाली परंतु बैठकीत असे काही ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले. उबाळे यांनी जरी स्पष्टपणे बोलणे टाळले असले तरी बैठकीतील अनेकांच्या चेहऱ्यावर सर्व चित्र स्पष्ट दिसत होते.