दापोडीतील दुर्घटनेतील आणखी एकाचा मृतदेह ताब्यात ; रविवारी ढिगा-यांखाली सात जण दबले होते
पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दापोडीत अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने सात जण दबले होते त्यातील पाचजणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले होते मात्र रविवारी घडलेल्या या दुर्घटनेत अग्निशामक दलाचे जवान शहीद झाले होते आज सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास एनडीएफ च्या जवानांनी अखेरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे .
विशाल जाधव आणि नागेश जमादार असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. विशाल जाधव हे अग्निशमन दलाचे जवान असून जमादार हे मजूर आहेत.
सविस्तर वृत्त असे की,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून दापोडीत अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना त्याठिकाणी नागेश जमादार हा पंधरा फूट खड्ड्यात काम करत होता. तेंव्हा सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास अचानक त्याच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळला, यात गळ्यापर्यंत तो गाडला गेला. नागेश मदतीची याचना करू लागला, हा आवाज शेजारीच खेळत असलेल्या ईश्वर बडगे आणि सीताराम सुरवसे यांनी ऐकला. दोघांनी कशाची ही परवा न करता ते थेट खड्ड्यात उतरले. तिथल्याच टिकाव आणि खोऱ्याने बचावकार्य सुरू केलं.
वाऱ्यासारखी ही बातमी परिसरात पसरली. अन बघ्यांची गर्दी वाढू लागली. बघता-बघता ईश्वर आणि सीताराम यांनी नागेशच्या कंबरेपर्यंतची माती बाजूला केली. तितक्यात सायंकाळी 6 वाजता अग्निशमन दलाचे जवान ही घटनास्थळी पोहचले. सरोज पुंडे, निखिल गोगावले आणि विशाल जाधव या तिन्ही जवानांनी बचावकार्य सुरू केलं.
तिन्ही जवानांनी अगदी गुडघ्यापर्यंतची माती बाजूला केली. ठेकेदार एम बी पाटीलच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग नागेशवर ओढवला. पण आता अवघ्या पंधरा मिनिटांत बचावकार्य संपणार होतं. मात्र बघ्यांचा आततायीपणा वाढला अन त्या सर्वांच्या पायाने पुन्हा मातीचा ढिगारा या तिन्ही जवानांसह नागेशच्या अंगावर कोसळला अन सहा ही जण गाढले गेले. मग आणखी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं. ईश्वर आणि सीताराम वरच्याच बाजूला असल्याने त्यांना शिडीच्या साह्याने बाहेर आले. तसेच काहीवेळाने सरोज आणि निखिल या दोन्ही जवानांना जीवदान मिळालं पण दुर्दैवाने विशाल जाधव यात शहीद झाले. तर मध्यरात्री साडे तीन वाजता नागेशचा मृतदेह एनडीएफ आणि लष्कराच्या तुकडीने बाहेर काढला.