क्राईम बातम्या

पाळणाघरात सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; ३५ वर्षीय आरोपीला अटक

File Photo

पुणे (वास्तव संघर्ष) पुण्यातील एका पाळणाघरात सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर एका ३५ वर्षीय व्यक्तीवर चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नोकरी करत असल्यामुळे त्या त्यांच्या सात वर्षांच्या मुलीला पाळणाघरात ठेवतात. जानेवारीपासून त्या मुलीला पाळणाघरात ठेवत होत्या. त्यावेळी आरोपी हा पाळणाघरातील आजी बाहेर गेल्यानंतर अल्पवयीन मुलीला जवळ घेऊन तिच्याशी अश्लील चाळे करत होता. तसेच, हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून मुलीला भीती दाखवत होता . गेल्या काही महिन्यांपासून आरोपी हा प्रकार करत होता. त्यामुळे मुलगी पाळणाघरात जाताना घाबरत होती.

आईने मुलीकडे चौकशी केली असता, तिने हा प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने तत्काळ चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Share this: