येथे भरते गरिबांच्या मुलांसाठी वस्ती शाळा
मराठवाडा जनविकास संघाचा अभिनव उपक्रम
पिंपरी, ( वास्तव संघर्ष ) :
पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकाकडून भवानी मंदिराकडे जाताना रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये वस्तीतील गरिब मुलांची भरलेली शाळा नजरेस पडते. हसतमुख मुले-मुली हातात कोरी पाटी घेऊन शिक्षणाचे धडे गिरविताना दिसून येतात. बालकांना शिक्षणाचा हक्क मिळावा, यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. परंतू त्या योजना हातावर पोट असणाऱ्या गरिबांपर्यंत पोहोचताना दिसून येत नाहीत. म्हणूनच गरिबांच्या मुलांना शिकता यावे, यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने पिंपळे गुरव येथे वस्ती शाळा सुरू करण्यात आली आहे.
या शाळेत कोणतेही वर्ग नाहीत, बसायला बाक नाहीत, परीक्षा घेणे-उत्तीर्ण करणे-पुढच्या वर्गात प्रमोट करणे असलाही प्रकार नाही; येथे फक्त पैशांअभावी अज्ञानाचा अंधार पसरलेल्या गरिबांच्या घरात ज्ञानाचा दिवा पेटविण्याचे कार्य चालते. तेही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. आज प्रत्येकजण उच्च शिक्षण घेऊन आपल्या करियरच्या वाटा निवडून पैसे कमविण्याचे स्वप्न पाहतो. परंतू आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा खर्या अर्थाने समाजासाठी व्हावा, म्हणून गरिबांच्या मुला-मुलींना शिकविण्याचा विचार सहसा कोणी करीत नाही. रस्त्यावरच्या कुटूंबांना रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे मुलांचे शिक्षण घेणे तर अवघडच … म्हणूनच आपण केलेल्या शिक्षणाचा उपयोग योग्य रितीने व्हावा, या कल्पनेतून त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरविण्याचा विडा मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी उचलला आहे.
मराठवाडा जनविकास संघाने उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये या चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या शाळेत जवळपास 50 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. यामध्ये बांधकाम मजुरांची, करचावेचक कामगारांची मुले-मुली शिकत आहेत.
आपण आतापर्यंत छोटी-मोठी मजुरीची कामे करून हातावर पोट भरवित आलो आहोत, त्याचप्रमाणे आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवून खर्च करण्यापेक्षा त्यांनीही छोटी-मोठी कामे करून आर्थिक हातभार लावावा, अशी अपेक्षा प्रत्येक पालकांकडून व्यक्त करण्यात येते. परंतू त्यांच्या मुलांनी जर शिक्षण घेतले, तर आणखी चांगल्या ठिकाणी नोकरी करून पैसा कमवू शकतील, हा विचार या वस्तीत राहणार्या पालकांच्या गळी उतरविण्यासाठी आदिती निकम ही तरुणी दारोदारी भटकून शिक्षणाचा प्रसार करीत आहे. या शाळेत मुलांना फक्त अक्षरी धडे दिले जात नाहीत, तर त्यांचे राहणीमान लक्षात घेता आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी यासोबत त्यांना व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षणही दिले जाते. मुलांमधील बहुआयामीपणा-कौशल्यबहुलता यांचा विकास समांतरपणे कसा साधता येईल, मुलांना ‘माणसे’ बनण्याचे आणि ‘माणसे’ म्हणून आत्मविश्वासाने जगण्याचे बळ कसे देता येईल, त्यांच्यात सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार कसा रुजवता येईल, असे अनेक प्रयोग तेथे चालू आहेत, असे आदिती निकम सांगतात.
या मुलांना शिकविण्यासाठी त्यांच्याकडे शैक्षणिक साहित्यही उपलब्ध असणे गरजेेचे आहे, हे लक्षात अरुण पवार स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून प्रत्येक मुलाला शैक्षणिक साहित्य पुरवतात. तसेच कधी कधी तर सर्व मुलांच्या न्याहरीची ही व्यवस्था करीत असतात. या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरविण्याची उत्सुकता ही आहेच, यातील विद्यार्थी हुशार देखील आहेत. या विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन व सोयसुविधा मिळाल्या, तर ते भविष्यात चांगले करियर घडवतील, असा विश्वास अरुण पवार यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य आदिती निकम भरभरून मदत करीत आहेत. वामन भरगंडे, सखाराम वाळकोळी, कृष्णाजी खडसे, कृष्णाजी फिरके, संपत गर्जे आदीनी खारीचा वाटा उचलत अरुण पवार व आदिती निकम यांना मदत करीत आहेत.