बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

आरक्षणाचा निर्णय स्वागतार्ह; पण श्रेयासाठी राजकीय जल्लोष करणे चुकीचा-राम जाधव

पिंपरी / प्रतिनिधी :
मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. मात्र, मराठा आरक्षण मिळावे, यासाठी तब्बल 42 लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. तसेच कोपर्डीमध्ये नराधमांच्या लैंगिक अत्याचाराची शिकार ठरलेल्या छकुलीच्या मारेकऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. अशा परिस्थितीत सामाजिक भान बाजूला ठेवून राजकीय श्रेयासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे, हे चुकीचे आहे, अशी टीका छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी केली.

मराठा समाजाला खर्‍या अर्थाने आरक्षणाची गरज होती. मराठा समाज पिढ्यान्पिढ्या शेती व्यवसाय करत आला आहे. समाजातील बोटावर मोजण्याएवढ्याच लोकांकडे शेकडो एकर जमिनी व संपत्ती आहे. 90 टक्के समाज आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. समाजाची शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पीछेहाट झालेली आहे. त्यामुळे मराठा समाजास आरक्षणाची गरज होती. अधिवेशनापूर्वीच आरक्षणावर निर्णय होणे अपेक्षित होते. तसे झालेही. परंतु आरक्षणाच्या निर्णयानंतर श्रेयासाठी मोठा जल्लोष सुरू आहे, तो चुकीचा आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील मराठा समाज बांधवांनी आत्महत्या करीत स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले, त्या बांधवांप्रति जल्लोष करणाऱ्या राजकीय पक्ष, कार्यकर्त्यांनी कृतज्ञता व्यक्त करणे अपेक्षित आहे. आरक्षण मिळाल्यानंतर विजयोत्सव साजरा करणे अपेक्षित नव्हते आणि नाहीच. अशा घटना घडल्या असताना केवळ ‘आम्ही केले’, हे दाखवून राजकीय श्रेय लाटण्यासाठी चाललेला विजयोत्सव म्हणजे सामाजिक संवेदना हरविल्याचा हा प्रकार आहे. या विजयोत्सवाची खरंच गरज होती का ? असा प्रश्न निर्माण होतो. ही समाजासाठी चिंताजनक बाब आहे, असे राम जाधव यांनी सांगितले.

ज्या गावातून आंदोलनाला सुरुवात झाली, त्या कोपर्डीत एका मुलीवर लैंगिक अत्याचार करून जीवे मारण्यात आले. हीच मुलगी मराठा आरक्षण आंदोलनाची प्रेरणास्त्रोत होती. अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होऊन नराधमांना फाशी देण्यात यावी, अशी मागणीही राम जाधव यांनी केली.

Share this: