साधनांवर प्रभुत्व असण्याऐवजी साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवताहेत : व्याख्याते गणेश शिंदे
मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे उद्घाटन
तळेगाव दाभाडे / पिंपरी / पुणे, प्रतिनिधी :
निव्वळ साधनांमध्ये सुख नाही. साधनांमध्ये सुख असते, तर जगातील सर्व श्रीमंत लोक सुखी झाले असते. साधनांवर आपले प्रभुत्व हवे, पण साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त केले.
ते तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतर्फे आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचे उद्घाटन व्याख्याते गणेश शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्याख्यानमालेत ‘जीवन सुंदर आहे’ विषयावर ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, कार्यवाह रामदास काकडे, विलास काळोखे, चंद्रकांत शेटे, शैलेश शाह, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदी उपस्थित होते.
गणेश शिंदे म्हणाले, की आयुष्य खूप सुंदर आहे. त्यासाठी जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हरवत चाललेला आपापसातील संवाद ही आनंदी जीवनातला प्रमुख अडथळा आहे. जिथे संवाद नाही, तिथे आनंदाचा प्रश्नच येत नाही. लोक साधनांमध्येच सुख शोधू लागली आहेत. पण एक लक्षात घेतले पाहिजे, की साधनांमध्ये सुख असते, तर जगातील अनेक विकसित राष्ट्रे आज समाधानी दिसली असती. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करणे गरजेचे आहे. पण दुर्दैव हे की, आजची शिक्षणव्यवस्था ही गुणाधारीत बनली आहे. अभ्यासक्रमाबाहेर डोकावून पाहायला हवे. वाचनालयांमध्ये विद्यार्थ्यांनी जाण्याची गरज आहे. पुस्तकी ज्ञानाबाहेरही जीवन समृद्ध करणाऱ्या खूप गोष्टी आहेत. आपल्या ज्ञानाचा समाजाला उपयोग झाला पाहिजे. ज्ञानाचा अहंकार जगणे समृद्ध करू शकणार नाही. शिक्षणातून स्वाभिमानशून्य होणं अपेक्षित नाही, असे शिंदे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की इतकं सुंदर जीवन जगा की समाजाला हेवा वाटला पाहिजे. स्वतःचं स्थान निर्माण करा. केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायात येऊन आपली वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. अपयश येईल, पण अपयशाने खचून न जाता मार्गक्रमण केल्यास आयुष्यात सुखच सुख आहे. अहंकार बाजूला ठेवता आला पाहिजे. कमालीचा आत्मविश्वास हवा. प्रत्येकात वेगळेपण असते, ते ओळखता यायला हवे. स्वतःचे आयुष्य सुंदर करताना इतरांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसेल, असे काम केले पाहिजे. गरिबीतही आनंद शोधता यायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश शाह यांनी, तर आभार विलास काळोखे यांनी मानले.