नोकरी नसल्याने तरुणांची सांगवीतील पवना नदीत उडी मारून आत्महत्या
पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरातील पवना नदीत सडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला . पिंपरी – चिंचवड अग्निशमन दलाच्या रहाटणी उपविभागाचे जवानांनी हा मृतदेह बाहेर काढला . ही घटना मंगळवारी ( दि . 4 ) सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली . या तरुणाची ओळख पटली असून त्याने नोकरी नसल्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे .
शुभम सुंदर चांदणे ( रा . सुसगाव ) असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे . मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पिंपरी – चिंचवड अग्निशमन दलाच्या रहाटणी उपविभागाला माहिती मिळाली की , पवना नदीमध्ये सांगवी येथे एक मृतदेह पाण्यावर तरंगत आहे .
त्यानुसार , फायरमन मनोज मोरे , विलास पाटील , विशाल पोटे यांना घेऊन वाहनचालक अमोल रांजणी यांचे पथक घटनास्थळी पोहोचले . एक तासाच्या अथक परिश्रमानंतर जवानांनी तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढला . मयत शुभम याला नोकरी नसल्याने तो नैराश्यात होता . त्यातूनच त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे . मागील पाच ते सहा दिवसांपासून त्याचा मृतदेह पाण्यात असल्याचा अंदाज आहे .