संभाजी भिडे हाजीर हो….!संभाजी भिडे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी
वास्तव संघर्ष आॅनलाईन – शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे . 2018 मध्ये निवडणूक आचारसंहिता लागू असताना भिडे यांनी बेळगाव येथे एका कुस्ती स्पर्धेच्या उदघाटनादरम्यान भाषण करताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे विधान केले होते .
त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी संभाजी भिडे यांच्यासह नऊ जणांवर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता . १३ एप्रिल २०१८ या दिवशी बेळगाव जवळील येळ्ळूर या गावात महाराष्ट्र मैदानावर कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी संभाजी भिडे यांनी आचारसंहिता लागू असतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे विधान केले होते . या खटल्यासंदर्भातील आत्तापर्यंतच्या सगळ्या सुनावणीच्या वेळी संभाजी भिडे गैरहजर राहिले होते मात्र आता संभाजी भिडे यांना कोर्टाने हाजीर होण्याच्या नोटीसीसह अटक वारंट देखील जारी करण्यात आले आहे . पुढची सुनावणी येत्या २४ मार्चला होणार आहे.