गांजाची विक्री करत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला केली अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) – बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करत असताना पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली . त्याच्याकडून एक किलो १७५ ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केली . ही कारवाई शनिवारी ( दि . ८ ) दुपारी चार वाजता पेरूची बाग येथे करण्यात आली .
भीमराव दगडू धांडे ( वय ५७, रा . ओटास्कीम , निगडी ) , असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे . याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई प्रसाद कलाटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , निगडी परिसरात पेरूची बाग येथे राजहंस बिल्डिंग क्रमांक १४ च्या समोर रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली .
पोलिसांनी परिसरात सापळा रचून भीमराव याला ताब्यात घेतले . त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक किलो १५७ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला . गांजासह ९९० रुपये असा एकूण २९हजार ९१५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त करत त्याला अटक केली . निगडी पोलीस तपास करीत आहेत .