पोलिस आयुक्तांनी पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी सुरू करावी; सतीश कदम यांची मागणी
पिंपरी(वास्तव संघर्ष) ; मुंबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयानेही सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पोलिसांना आठ तासांची ड्युटी सुरू करावी, अशी मागणी बी. आर. आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात सतीश कदम यांनी गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये पोलीसांना आठ तासांची ड्युटी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पोलीस कार्यतत्पर झालेच पण त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातही सकारात्मक बदल दिसून आले आहेत. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंवड शहर पोलीस आयुक्तांनी देखील पुढाकार घेऊन सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पोलिसांसाठी आठ तासांची ड्युटी सुरू करावी. एकीकडे इतर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा सुरू करण्याचे नियोजन असताना पोलिसांवर अन्याय करणे चुकीचे ठरणार आहे. पोलिसांना ५ दिवसांचा आठवडा लागू करणे शक्य होणार नाही. त्यांना किमान ८ तासांची ड्युटी तरी सुरू करावी. इतर कर्मचाऱ्यांना विविध संघटना असतात. त्या संघटना शासनाकडे वेळोवेळी मागण्या करीत असतात. मात्र पोलीसांना अशा प्रकारची संघटना काढता येत नाही आणि त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची सोय नाही. त्यामुळे पोलीस बांधवांवरील अन्यायाकडे कोणाचे लक्ष जात नाही.
पोलिसांना साप्ताहिक सुट्टी मिळते. मात्र विविध सण, निवडणूक, मोठा कार्यक्रम, तणावाचे वातावरण तसेच व्हीव्हीआयपी बंदोबस्तासाठी पोलीसांची साप्ताहिक सुट्टीही रद्द केली जाते. त्याबदल्यात वेगळी सुट्टी देखील दिली जात नाही. सध्या सर्वाधिक धोका पोलिसांनाच असतो. पोलिसांचे काम खूप ताण-तणावाचे असते. त्यांना १२ ते १८ तास काम करावे लागते. अनेकदा गुन्ह्यांच्या तपासासाठी कुटुंबांपासून दूर जाऊन रहावे लागते. त्यामुळे पोलिसांना आठ तासांची ड्युटी लागू केल्यास त्यांच्यावरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल. या मागणीचा सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सतीश कदम यांनी केली आहे.”