कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ भाजपा आमदार महेश लांडगे मैदानात
पिंपरी (वास्तव संघर्ष)कीर्तनातून समाज परिवर्तनाचा वसा घेतलेल्या ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यथ तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले आहेत. वारकरी संप्रदायाचे आदरणीय इंदुरीकर महाराजांच्या सोबत संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर उभे आहे. महाराजांनी फक्त आवाज द्यावा आम्ही संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या समर्थनार्थ उतरू, असा एल्गार लांडगे यांनी केला आहे.
भोसरीतील मोशी या ठिकाणी शिवजयंती आणि महाशिवरात्री निमित्त जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आयोजित केला होता. त्यानिमित्त ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन झाले. विशेष म्हणजे, आमदार महेश लांडगे यांनी या सोहळ्यानिमित्त इंदुरीकर महाराज यांची बैलगाडीतून मिरवणूक काढली आहे. यावेळी माजी महापौर राहुल जाधव आणि भाजपाचे नेते-पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, वारकरी सांप्रदायाचा पताका खांद्यावर घेवून हभप. इंदुरीकर महाराज यांनी महाराष्ट्रात प्रबोधनाचे कार्य केले आहे. माझ्यासरख्या असंख्य तरुणांना वारकरी सांप्रदाय आणि आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा महाराजांच्या कीर्तनातून मिळाली आहे. त्यांच्या कीर्तनाचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. विनोदी भाषेत प्रबोधनाची शैली निवृत्ती महाराजांकडे आहे. पण, त्यांच्या कीर्तनातील एखाद्या वाक्यांचा आधार घेत आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एखाद्या समाजप्रबोधन करणाऱ्या व्यक्तीला मानसिक त्रास होईल, बदनामी होईल, असे वातावरण निर्माण करणे योग्य नाही. त्यामुळे आम्ही पिंपरी-चिंचवडकर ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरायला तयार आहोत, असा इशाराही आमदार लांडगे यांनी दिला आहे.
आम्ही इंदुरीकर महाराजांच्या पाठिशी : चंद्रकांत पाटील
आम्ही इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचे समर्थन करीत नाही. पण, त्यांच्या पाठिशी आहे, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. इंदुरीकर महाराजांनी महिलांबद्दल तसं वक्तव्य करायला नको होते. त्यांची महिन्याला 80 प्रवचने होतात. ती सगळी जनप्रबोधनाची असतात अत्यंत मार्मिकपणे समाजातील चुकांवर ते बोट ठेवत असतात. मी त्यांच्या अनेक किर्तनांना गेलो आहे. इंदुरीकर महाराजांची कीर्तनं समाज प्रबोधनासाठी असतात. परंतु, त्यांनी महिलांबाबत केलेलं आताचं वक्तव्य चुकीचं आहे, असेही पाटील म्हणाले आहेत.
वारकरी सांप्रदाय संपवण्याचा घाट : भाजपा
वारकरी सांप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव आहे. त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीवाले इंदुरीकर महाराजांवर टीका करत आहेत. धार्मिक ग्रंथ आणि गुरूचरित्राच्या आधारेच इंदुरीकर महाराज बोलत आहेत, असा दावा भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे. इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनात जे दाखले देत आहेत ते ग्रंथांच्या आधारेच देत आहेत, असं कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.