भाजप नगरसेविका सिमा सावळे यांचा ‘मास्टरट्रोक’ ; विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे पद धोक्यात?
पिंपरी(वास्तव संघर्ष ) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांचे आणि त्यांच्या सौभाग्यवती शितल काटे यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. पिंपळे सौदागर येथील शिवांगण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील त्यांचे जनसंपर्क कार्यालय बांधकाम परवानगी न घेता बनवले आहे. असा आरोप भाजपा नगरसेविका तथा स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी केला आहे.आपल्या आक्रमक भूमिकेमुळे सिमा सावळे या संपुर्ण शहराला परिचित आहेत. विरोधीपक्षनेते यांच्यावर केलेल्या मास्टरट्रोक मुळे काटे आता याला काय उत्तर देतील हे पहावे लागेल.
सिमा सावळे यांनी केलेल्या आरोपात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे आणि त्यांच्या सौभाग्यवती शितल काटे यांचे सर्व्हे क्रमांक १८३ येथील शिवांगण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात जनसंपर्क कार्यालय आहे. हे कार्यालय बांधकाम परवानगीचे न घेता बांधण्यात आले आहे.
महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम १० (१ ड) नुसार नगरसेवकाने किंवा त्याच्या नातलगाने अनधिकृत बांधकाम केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची कायदेशीर तरतूद आहे. या कायद्यानुसार नाना काटे आणि शितल काटे हे दोघेही नगरसेवकपदी राहण्यास अपात्र ठरत आहेत. असेही सावळे यांनी म्हंटले आहे