बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांना किमान संपादकपद तरी द्यायला हवं होतं माञ त्यांच्यावर अन्याय झाला – रामदास आठवले

ठाणे(प्रतिनिधी) : ‘ महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे . शिवसेनेची भूमिका त्यांनी जोरदारपणे मांडली होती . पण पक्षानं त्यांच्यावर अन्याय केला . त्यांना किमान ‘ सामना ‘ चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं , ‘ असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे . ठाण्यातील एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते . भाजप – मनसे युती , औरंगाबाद नामांतर व सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती अशा सर्वच विषयांवर त्यांनी मतं मांडली . ‘ सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती झाली ही चांगलीच बाब आहे . पण हे पद संजय राऊत यांना मिळायला हवं होतं . बाळासाहेब ठाकरे असते तर चित्र वेगळं दिसलं असतं , ‘ असंही ते म्हणाले .

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपसोबत यायचं असेल तर त्यांची प्रादेशिक भूमिका बदलावी लागेल . परप्रांतीयांना त्यांच्या पक्षाचा असलेला विरोध थांबवावा लागेल . तरच भाजपचं त्यांच्याशी जळ शकेल . मात्र , ते सोबत आले तरी भाजपचा फार मोठा फायदा होईल , असं वाटत नसल्याचं आठवले यांनी सांगितलं . औरंगाबादच्या नामांतराच्या मनसे व भाजपच्या मागणीला त्यांनी विरोध दर्शवला . औरंगाबादच नव्हे तर कोणत्याही ठिकाणाचं जुनं नाव बदललं जाऊ नये , अशी आमची भूमिका आहे , असं ते म्हणाले . मुंबई , नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये भविष्यात महायुतीचीच सत्ता येईल , असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .

Share this: