राज्यात संचारबंदी लागू ;प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेश-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

वास्तव संघर्ष आॅनलाईन मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर पाऊल उचलले आहे. राज्यात सर्वत्र ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. संचारबंदीदरम्यान रस्त्यावर ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, अत्यावश्यक सेवेव्यतिरीक्त इतर कोणत्याही सेवा सुरू असणार नाही असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली.

प्रधानमंत्री मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी रविवारी जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिला. मात्र, यासोबतच अनेक बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. थाळ्या, घंटा वाजविल्या पण हे सगळे कोरोनाला घालविण्यासाठी नव्हते तर वैद्यकीय क्षेत्रात सतत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी होते, हे ध्यानात ठेवा, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी राज्यात आज जमावबंदीचा आदेश मोडणाऱ्या सर्वांनाच फैलावर घेतले. आज अनेक भागांत लोकांनी रस्त्यावर उतरून विनाकारण गर्दी केल्याचे तसेच वाहनेही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर धावत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. त्यामुळेच राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मला घ्यावा लागत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Share this: